‘रिसॅट-२ बीआर-१’ उपग्रहामुळे भारताच्या संरक्षणात लक्षणीय वाढ

RISAT 2BR1

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने रिसॅट मालिकेतील RISAT-2BR1 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा उपग्रह खूप महत्वाचा आहे. या उपग्रहाला स्पाय सॅटलाइट म्हटले जाते. हा एक बहुउपयोगी उपग्रह असून त्याचे वेगवेगळे फायदे आहेत. पीएसएलव्ही रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्ही हा भारताचा अत्यंत भरवशाचा उपग्रह प्रक्षेपक आहे. पीएसएलव्हीची ही ५० वी मोहीम होती.

 

पाकवर राहणार करडी नजर
RISAT-2BR1 हा रडार इमेजिंग अर्थ ऑब्जर्व्हेशन सॅटेलाइट आहे. या उपग्रहाचे वजन ६२८ किलो आहे. RISAT-2B मालिकेतील हा दुसरा उपग्रह आहे. RISAT-2 ची जागा घेण्यासाठी या वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या RISAT-2B उपग्रहाचे प्रक्षेपण झाले होते. रिसॅट उपग्रहांची मालिका असून प्रामुख्याने हेरगिरीसाठी या उपग्रहांचा उपयोग करण्यात येणार आहे. या उपग्रहामुळे सीमावर्ती भागातील सुरक्षा अधिक बळकट होईल. शत्रुच्या हालचाली या उपग्रहाच्या नजरेतून सुटण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. सीमेवरील चीन आणि पाकिस्तानच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवता येईल.

काही दिवसांपूर्वीच इस्रोने कार्टोसॅट-३ या अर्थ इमेजिंग सॅटेलाइटचे प्रक्षेपण केले होते. RISAT-2BR1 या उपग्रहासोबत इस्रोने अन्य देशांच्या आणखी नऊ उपग्रहांचे प्रक्षेपण केले. यातले सहा उपग्रह अमेरिकेचे तर, इस्रायल, इटली आणि जापानचा प्रत्येकी एक उपग्रह आहे. चांद्रयान-२ ही यंदाच्या वर्षातील इस्रोची सर्वात मोठी महत्वकांक्षी मोहिम होती. त्यात विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगचे अपयश वगळता ही मोहीम यशस्वी ठरली. गगनयान ही इस्रोची पुढची महत्वाची मोहिम आहे. या मिशनतंर्गत तीन भारतीयांना अवकाशात पाठवण्याचे इस्रोचे लक्ष्य आहे.

‘रिसॅट-२ बीआर-१’ची खास वैशिष्टे
रिसॅट-२ बीआर१ उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित झाल्यानंतर भारताची रडार इमेजिंग म्हणजे शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची क्षमता कैकपटीने वाढणार आहे.
या उपग्रहाचे काम सुरु झाल्यानंतर लगेचच आपल्याला आवश्यक फोटो मिळण्यास सुरुवात होईल.
या उपग्रहामुळे सीमावर्ती भागातील सुरक्षा अधिक बळकट होईल. सैन्यदलांना रणनिती ठरवण्यात या उपग्रहाची मदत होईल.
शत्रुच्या हालचाली या उपग्रहाच्या नजरेतून सुटण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे.
कुठल्याही वातावरणात ढगांच्या आडूनही फोटो काढण्यास RISAT-2BR1 सक्षम आहे.
त्याशिवाय शेती, जंगल आणि आपत्तीच्या काळातही या उपग्रहाची मदत मिळणार आहे.
मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतर भारताने रिसॅट २ उपग्रह प्रक्षेपित केला होता.
पाकिस्तानातून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी, सीमेपलीकडे दहशतवाद्यांचे तळ याची खडानखडा माहिती मिळू शकेल.
बालाकोट सारख्या मिशनची आखणी करण्यामध्ये भविष्यात रिसॅट-२बीआर१ खूप महत्वाचा ठरेल.

Protected Content