जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महापालिकेच्या प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे शहरात गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांना नागरीकांना तोंड द्यावे लागत आहे. जळगाव महपालिकेला शिस्त लावण्यासह सर्व कामे मार्गी लावण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष आयुक्तांची शहराला गरज आहे. यामुळे त्यांची येथे नियुक्त करावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सोमवारी ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजता शिवतीर्थ मैदान येथे स्वाक्षरी मोहिम सुरू करण्यात आली आहे.
जळगावकरांकडून महापालिका मालमत्ता कर वसुल करण्यात येतो, मात्र महापालिकेकडून कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. राजकीय पक्षात सत्ता बदलून देखील जळगावकरांना पाहिजे तो दिलासा मिळालेला नाही. अनेक आश्वासने देवून वर्षानुवर्षे सत्तेत राहणाऱ्या पक्षांनी देखील जळगाव शहरातील समस्या सोडविण्याकडे तोंड फिरविले आहे. महापालिका प्रशासनातील सर्वेसर्वा असलेल्या आयुक्तांनी देखील पाहिजे त्या प्रमाणात दखल घेतलेली नाही. आयुक्तांनी कायदेशीर लढा देवून पुन्हा नियुक्ती मिळविली आहे, मात्र जळगावरांच्या समस्या सोडविण्यात आयुक्त अपयशी झाले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन म्हणून तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी ३१ जुलै रोजी प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने शिवतीर्थ मैदानात स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येत आहे. स्वाक्षरी मोहिम राबविल्यानंतर जिल्हाधिकारी मार्फत निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देण्यात येणार आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिनेश कोळी, महानगराध्यक्ष पंकज पवार, सरचिटणीस विजय पाटील, जतीन पांड्या, युसूफ खान, नितीन सुर्यवंशी, नरेंद्र सपकाळे, युवराज राठोड यांच्यासह प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.