लैंगिक अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या; राष्ट्रवादी आदिवासी सेलचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील खडके येथील वसतीगृहात अल्पवयीन मुले व मुलींवर लैंगिक अत्याचाराची सखोल चौकशी करून संशयिताला फाशीची शिक्षा करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आले.

 

निवेदनात म्हटले आहे की, एरंडोल तालुक्यातील खडके येथील वसतीगृह येथे आदीवासी विद्यार्थी व विद्यार्थींनी वास्तव्याला असतांना काळजी वाहक गणेश शिवाजी पंडीत याने ५ अल्पवयीन विद्यार्थींनी आणि एका विद्यार्थ्यांवर वर्षभरापासून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. या घटनेमुळे संपुर्ण राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ही घटना अमानविय आणि मानव जातीला काळीमा फासणारी आहे. महाराष्ट्रासह देशात एक घटना घडल्यानंतर दुसरी घटना घडत आहे. कायदा व सुव्यवस्था राहिलेली नसल्याने आदिवासी समाज आज सुरक्षित नाही. मणिपूर घटनेनंतर आता एरंडोल तालुक्यातील अशी घटना घडल्यानंतर संपुर्ण आदिवासी समाज धस्तावला आहे. या घटनेत संशयित आरोपी गणेश पंडीत आणि त्याला साथ देणारी त्यांची पत्नी आणि संस्था चालक यांची सखोल चौकशी करण्यात यावी, हा खटला फास्ट ट्रॅक चालवून सहा महिन्यात दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेलच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आले.

 

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर प्रमुख अशोक लाडवंजारी, युवा महानगराध्यक्ष रिकू चौधरी, युवा जिल्हाध्यक्ष सुभान तडवी, राजू तडवी, तुराब तडवी, शकील तडवी, सुनिल माळी, रहिम तडवी, अशोक सोनवणे आदी उपस्थित होते.

Protected Content