फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर येथील श्री खंडेराव वाडी देवस्थान येथे आज श्याम भक्तांसाठी विशेष भजन व संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली आहे. गुरुवार, 12 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजेपासून रंगणाऱ्या या कार्यक्रमाकडे श्याम भक्तांचे लक्ष लागले आहे.
श्री खंडेराव वाडी देवस्थान परिसरात आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम श्याम प्रेमी फैजपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तीमय वातावरणात श्यामबाबांच्या नामस्मरणाचा आणि भजनांचा सुरेल सोहळा अनुभवता येणार आहे. कार्यक्रमासाठी मंदिर परिसरात विशेष सजावट करण्यात आली असून भाविकांसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

या संगीतमय भक्ती कार्यक्रमात मध्यप्रदेशातील मक्सी येथील प्रसिद्ध श्यामप्रेमी गायक अमित पारीक आपल्या मधुर आवाजात श्यामबाबांची गीते सादर करणार आहेत. तसेच नागपूर येथील श्यामप्रेमी गायिका निहारिका पुरोहित या देखील आपल्या सुरेल भजनांनी भक्तांना भक्तीरसात रंगविणार आहेत. दोन्ही कलाकारांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाची रंगत अधिक वाढणार असून भक्तांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती मिळणार आहे.
कार्यक्रम सायंकाळी 7 वाजता सुरू होऊन प्रभू इच्छेपर्यंत अखंडपणे चालणार असल्याने मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आयोजकांनी परिसरातील तसेच पंचक्रोशीतील श्याम भक्तांना सहपरिवार उपस्थित राहून श्यामबाबांचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन केले आहे. या निमित्ताने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



