सोलापूर प्रतिनिधी । देशात हिंदू दहशतवादाच्या कारवाया चालत असल्याचे वक्तव्य तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते. या वक्तव्याला अनुसरून आजही पाकिस्तान फायदा घेत पाक पंतप्रधान इम्रान खान हे जगाच्या पाठीवर जाऊन भारताच्या विरोधात आरोप करीत आहेत. त्याला तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेच जबाबदार असल्याने शिंदे यांनी भारतीयांची जाहिर माफी मागावी अशी मागणी भाजपचे प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी सोलापूर येथील एका कार्यक्रमात केली आहे.
सोलापुरात भाजपच्यावतीने हुतात्मा स्मृतिमंदिरात आयोजित संवाद कार्यक्रमात डॉ. पात्रा यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहकारमंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी, महापौर शोभा बनशेट्टी, पक्षाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आदी उपस्थित होते.
जम्मू-काश्मीरविषयक अनुच्छेद ३७० कलम हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी घेतल्यानंतर पाकिस्तान भारताच्या विरोधात अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघासह मुस्लीम राष्ट्रांकडे दाद मागत आहे. परंतु त्याची कोणीही दखल घेतली नाही. यात भारताची मुत्सद्देगिरी यशस्वी ठरत असताना दुसरीकडे मात्र देशातील काँग्रेसचे नेते पाकिस्तानला पूरक अशीच भाषा करीत आहेत, असा आरोप करीत, काँग्रेसची जबाबदार नेते मंडळी काश्मीरच्या मुद्दय़ावर पाकिस्तानचीच भाषा बोलू लागल्यामुळे त्याचा भारतावर थेट परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मत डॉ. पात्रा यांनी व्यक्त केले.