नवी दिल्ली- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । टीम इंडियाचा युवा कर्णधार शुबमन गिलने अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या कसोटी कारकिर्दीतील दहावे शतक ठोकून इतिहास रचला आहे. या जोरदार खेळीनं त्याने भारताचे माजी फलंदाज आणि विद्यमान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा विक्रम मोडीत काढत, एका नव्या यशाची नोंद केली आहे.
शुबमनने भारतीय डावातील 130व्या ओव्हरमध्ये पाचव्या चेंडूवर 3 धावा घेत आपले शतक पूर्ण केले. त्याने 177 चेंडूत 57.63 च्या स्ट्राईक रेटने हे शतक झळकावले असून या खेळीत 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. विशेष म्हणजे, शुबमनसाठी कर्णधार म्हणून हे पाचवे शतक ठरले आहे, ज्यामुळे तो विराट कोहलीच्या एका खास विक्रमाच्या बरोबरीवर पोहोचला आहे.

विराट कोहलीने 2017 आणि 2018 या वर्षांत कर्णधार म्हणून प्रत्येकी 5 शतकं ठोकली होती. त्यासाठी त्याने अनुक्रमे 16 आणि 24 डाव खेळले होते. मात्र शुबमनने हीच कामगिरी अवघ्या 12 डावांत पार केली आहे, हे विशेष. यामुळे एका कॅलेंडर वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये 5 शतकं करणारा तो विराटनंतर दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे.
शतकांची ही घोडदौड केवळ भारतीय पातळीपुरती मर्यादित नाही. शुबमन गिल हा कसोटीत कर्णधार म्हणून सर्वात कमी डावांमध्ये 5 शतकं करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. यामध्ये पहिल्या स्थानावर इंग्लंडचा सर एलिस्टर कूक असून त्याने केवळ 9 डावांत 5 शतकं झळकावली होती. दुसऱ्या क्रमांकावर भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर असून त्यांनी 10 डावांत ही कामगिरी केली होती. आता त्यांच्यापाठोपाठ शुबमन गिलने 12 डावांतच ही यादी गाठली आहे.
गिलच्या या विक्रमी खेळीत भागीदारीचे योगदानही लक्षणीय ठरले. तिसऱ्या विकेटसाठी त्याने यशस्वी जैस्वालसोबत 137 चेंडूत 74 धावांची भागीदारी केली. यानंतर नितीश कुमार रेड्डीसह चौथ्या विकेटसाठी 105 चेंडूत 91 धावा जोडल्या. त्यानंतर ध्रुव जुरेलसह अर्धशतकी भागीदारी करत त्याने आपले शतक पूर्ण केले. संघासाठी टिकून खेळणारा गिल हा सामन्यातील केंद्रबिंदू ठरला.
या कामगिरीनंतर शुबमनने स्वतःला एक ‘क्लास अपार्ट’ खेळाडू म्हणून सिद्ध केले असून कर्णधारपदाच्या जबाबदारीसह तो परिपक्वतेने खेळ करत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे हे सातत्य भारतासाठी निश्चितच मोठी जमेची बाजू ठरत आहे.



