मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तांबे पिता-पुत्राने कॉंग्रेससह महाविकास आघाडीची कोंडी केल्यानंतर आता भाजपच्या नेत्या तथा या निवडणुकीतील उमेदवार शुभांगी पाटील यांनी मातोश्रीला भेट देऊन पाठींब्याची चाचपणी केली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात गतीमान घडामोडी घडत आहेत. आज सकाळीच खासदार संजय राऊत यांनी येथील निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे संकेत दिले होते. या पाठोपाठ धुळे येथील शुभांगी पाटील यांनी मातोश्रीला भेट दिली असून त्यांना शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठींबा मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य टीचर्स असोसिएशनच्या अध्यक्षा शुभांगी पाटील यांनी सप्टेंबर महिन्यात भाजपामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला होता. त्यांनी देखील नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरलेला आहे. त्यांना भाजपाचा अधिकृत पाठिंबा मिळेल, अशी शक्यता होती. मात्र भाजपा कॉंग्रेसच्या सत्यजित तांबे यांच्याबाजूला झुकत असल्याचे दिसत असतांनाच शुभांगी पाटील यांनी कालच एक व्हिडिओ प्रसारीत करुन त्यांची भूमिका मांडली आहे. यात त्यांनी आपण ही निवडणूक लढविणारच, असा निर्धार व्यक्त केला होता.
यानंतर आज शुभांगी पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली असून त्यांना शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठींबा मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास सत्यजीत तांबे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.