मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने रावेर लोकसभा मतदारसंघातून अलीकडेच भाजपमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून रावेर लोकसभा मतदारसंघात नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याचा घोळ सुरू आहे. खरं तर ही जागा गेल्या वेळेस कॉंग्रेसने लढविली होती. यंदा मात्र ही जागा शरद पवार गटाला मिळाली आहे. प्रारंभी आमदार एकनाथराव खडसे यांनी येथून लढण्याची घोषणा केली होती. नंतर, मात्र त्यांनी वैद्यकीय कारणास्तव आपण लढण्यास असमर्थ असल्याचे घोषीत केले. यानंतर यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील, रावेरचे माजी आमदार अरूण पाटील आदींची नावे समोर आली. यानंतरच्या टप्प्यात भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, उद्योजक विनोद तराळ आणि कंत्राटदार विनोद सोनवणे यांची नावे समोर आली. मध्यंतरी भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे हे देखील पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती आली होती.
यानंतर अलीकडेच रावेर येथील उद्योजक श्रीराम दयाराम पाटील यांचे नाव समोर आले. त्यांनी मुंबई येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती. यानंतर सोमवारी पक्षाच्या पुणे येथील बैठकीत रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर अतिशय विस्तृत अशी चर्चा झाली. यात शेवटच्या टप्प्यात फक्त रवींद्रभैय्या पाटील आणि श्रीराम पाटील ही दोन नावे उरली. तर दोन्ही उमेदवारांशी शरद पवार व जयंत पाटील यांनी स्वत: चर्चा केली. यानंतर रात्री उशीरा श्रीराम पाटील यांनी भाजपचा त्याग करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केला तेव्हाच त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, यानंतर आज पक्षाने ट्विटरवरून उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात रावेर लोकसभा मतदारसंघातून उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी प्रदान केल्याचे जाहीर केले आहे. या माध्यमातून रावेरमध्ये आता भाजपच्या रक्षा निखील खडसे यांचा मुकाबला हा शरद पवार गटाच्या श्रीराम दयाराम पाटील यांच्याशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.