एरंडोल प्रतिनिधी । येथील पंचायत समितीच्या सभागृहात आज सकाळी अंधश्रद्धा निर्मुलनासंबंधी कार्यक्रम घेण्यात आला. यात समाजात असलेल्या गैरसमजुती बाबत संत गाडगेबाबा राज्यस्तरीय प्रबोधन यात्रा प्रचार अंतर्गत अंधश्रद्धा निर्मुलन प्रचारक श्रीकृष्ण धोटे यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी श्रीकृष्ण धोटे यांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा २०१३ जादूटोणा विरोधी कायदा वैज्ञानिक दृष्टिकोन अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती, चमत्कार सादरीकरण व त्यातील सत्यता याबाबत उपस्थितांचे प्रबोधन केले. तसेच यावेळी विविध प्रत्यक्षिकाद्वारे भोंदू आपल्याला कसे फसवतात याचे प्रात्यक्षिक दाखवुन उपस्थितांनी विचारलेल्या विविध शंकांचे देखील निरसन केले. यावेळी त्यांनी १२ प्रकारे आपली फसवणुक कशी होऊ शकते ते चित्राद्वारे समजवून सांगितले. तसेच कोणताही शासकीय फंड न घेता संपुर्ण राज्यभर मोटारसायकलद्वारे हा प्रचार प्रसार करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास पोलीस निरीक्षक अरुण हजारे, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, बहुजन वंचित आघाडीचे प्रा.प्रतापराव पवार, नगरसेवक अभिजित पाटील, रविंद्र पाटील, डॉ.सुधीर काबरा, संजय भदाणे, विशाल सोनार, मिनाक्षी पाटील, आरती ठाकुर, शोभना साळी, डॉ.प्रशांत पाटील तालुक्यातील पोलिस पाटील आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रा. प्रतापराव पवार यांनी तर आभार पो.कॉ.संदीप सातपुते यांनी मानले.