अडावद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अडावद येथे गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी श्रींचे विसर्जन मोठ्या उत्साहात होणार असताना, महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे संपूर्ण गाव अंधारात बुडाले. यामुळे श्री विसर्जन मिरवणुकीचा आनंद नागरिकांना अंधारातच साजरा करावा लागला. मात्र पोलीस प्रशासनाने घेतलेल्या चोख बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि मिरवणूक शांततेत पार पडली.

अडावद (ता. चोपडा) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेश विसर्जन सातव्या दिवशी मोठ्या जल्लोषात साजरे होत होते. महर्षी वाल्मिक गणेश मित्र मंडळ, दोस्ती ग्रुप, शिवशक्ती ग्रुप, रायबा ग्रुप, महात्मा फुले गणेश मित्र मंडळ, जागेश्वर जीर्णोद्धार मंडळ, बालाजी मंडळ, त्रिमूर्ती, साई ग्रुप आणि पंचवृक्ष (सह्याद्री) मंडळ अशा दहा मंडळांनी या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला होता. दुपारी चार वाजता सुरू झालेली मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती, मात्र संपूर्ण गाव अंधारातच डुंबत होते.

गावात चार महिन्यांपूर्वी मंजूर करण्यात आलेली भूमिगत केबल अद्याप मुख्य रस्त्यावर टाकण्यात आलेली नाही. विशेषतः यंदा मोठ्या उंचीच्या गणेश मूर्ती असल्याने विद्युत तारा अडथळा ठरणार हे लक्षात घेता, ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाने विसर्जनपूर्वी महावितरणला केबल लवकर टाकण्याची सूचना दिली होती. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करत गावात रात्री एक वाजेपर्यंत वीजच बंद ठेवली.
या अंधारामुळे मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या नागरिकांना आणि बघ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. लहान मुले, महिलावर्ग, वृद्ध यांना वाटच चाचपडावी लागली. एवढ्या संवेदनशील परिस्थितीत अंधाराचा फायदा घेऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असतानाही संबंधित विभागाने याचे गांभीर्य ओळखले नाही. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ड्रोन मागवले होते, मात्र अंधारामुळे त्यांचा उपयोग झाला नाही.
पोलीस प्रशासनाच्या सज्जतेमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक प्रमोद वाघ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. चोपडा शहर, ग्रामीण, जळगाव शहर, जिल्हापेठ, तालुका, एमआयडीसी पोलीस स्टेशन तसेच वाहतूक शाखेचे एकूण ५० पोलीस, ९० गृहरक्षक दलाचे जवान, जिल्हा नियंत्रण कक्षातील राखीव पथक तैनात करण्यात आले होते. या बंदोबस्तामुळे मिरवणूक कोणतीही अडचण न होता शांततेत पार पडली.
गणेशभक्तांचा उत्साह आणि श्रद्धा अखंड राहिली, मात्र महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे गावाने उत्सवाचा आनंद अंधारात साजरा केला. यावर प्रशासनाने गांभीर्याने विचार करून पुढील वर्षी अशी वेळ पुन्हा येऊ नये याची खबरदारी घ्यावी, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.



