मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या टीम इंडियाच्या एकदिवसीय व टी-20 संघात मोठे बदल करण्यात आले असून, अनेक धक्कादायक निर्णय समोर आले आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे पुनरागमन निश्चित असतानाही एकदिवसीय कर्णधारपद नव्या दमाच्या शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. तर, श्रेयस अय्यरला थेट उपकर्णधार म्हणून संधी दिल्याने चर्चांना सुरुवात झाली आहे. दुसरीकडे, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी आणि जडेजा यांना डच्चू देण्यात आला आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी निवड समितीने जाहीर केलेल्या संघांमध्ये अनेक नावांना विश्रांती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा, जो भारतीय एकदिवसीय संघाचा नियमित कर्णधार होता, त्याच्याकडून नेतृत्व काढून घेतले गेले आहे. त्याचबरोबर विराट कोहलीचा संघात समावेश असूनही त्याला देखील नेतृत्व भूमिकेत स्थान मिळालेले नाही. याउलट कसोटी संघाचे नेतृत्व करणाऱ्या शुभमन गिलकडे आता एकदिवसीय संघाचेही नेतृत्व देण्यात आले आहे. गिलने याआधी कधीही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात कर्णधारपद भूषवलेले नाही.

श्रेयस अय्यरच्या बाबतीत पाहिल्यास, काही महिन्यांपूर्वी संघाबाहेर पडल्यावर त्याच्यावरील नाराजी उघड झाली होती. त्याच्या वडिलांनीही सोशल मीडियावर निवड प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र आता त्याला थेट उपकर्णधार पद बहाल करण्यात आले असून, हे काहीसं ‘लाॅटरी’ लागल्यासारखेच मानले जात आहे. यावरून निवड प्रक्रियेत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
टीम इंडियाच्या संघात जसप्रीत बुमराहला टी-20 मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे, पण एकदिवसीय सामन्यांमधून त्याला विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत हे दोघेही अद्याप दुखापतीतून सावरलेले नसल्यामुळे त्यांचा दौऱ्यात समावेश झालेला नाही. विशेष म्हणजे अनुभवी मोहम्मद शमीला कोणत्याही संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन हे देखील एकदिवसीय संघाबाहेर राहिले असून, याऐवजी ध्रुव जुरेलला बॅकअप यष्टीरक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे. टी-20 संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे आणि गिल त्यांचा उपकर्णधार असेल.
या दौऱ्यात भारत ३ एकदिवसीय आणि ५ टी-20 सामने खेळणार असून, पहिला एकदिवसीय सामना १९ ऑक्टोबरला पर्थ येथे होणार आहे. त्यानंतर अॅडलेड आणि सिडनी येथे उर्वरित दोन सामने खेळवले जातील. टी-20 मालिका त्यानंतर सुरु होणार आहे.
2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी रोहित आणि कोहलीचा विचार अद्याप खुला असल्याचे निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांना कर्णधारपदापासून दूर ठेवण्याचा निर्णय हा भविष्यातील योजना डोळ्यांसमोर ठेवून घेतल्याचे सूचित होते.
शुभमन गिलने आतापर्यंत 55 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात 2775 धावा आणि 8 शतकांची नोंद आहे. मात्र नेतृत्वाचा फारसा अनुभव नसतानाही त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.



