जळगाव प्रतिनिधी | श्री क्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समर्थ पालखी-पादुकांचे ११ मे रोजी जळगाव शहरात आगमन होणार आहे. १२ च्या दुपारीपर्यंत पालखीचा शहरात मुक्काम राहणार असून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समर्थ पालखी पादुकांचा स्वामी भक्तांना दर्शनाचा लाभ व्हावा, सेवेची संधी उपलब्ध व्हावी त्याचप्रमाणे क्षेत्र अक्कलकोट येथे बांधण्यात येत असलेल्या भक्त निवास, महाप्रसादालय ,आणि प्रतीक्षा सभागृहासाठी निधी उपलब्ध व्हावा, या उद्देशातून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने दरवर्षी पालखी परिक्रमेचे आयोजन करण्यात येते.
ही पालखी महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यातून परिक्रमा करीत असून जळगाव शहरात पालखी परिक्रमेचे हे यंदाचे १३ वर्ष असून शहरातील गणेशवाडी परिसरातील शिरसाळे परिवाराकडून पालखी सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ रोजी पालखीचे शोभायात्रेने गणेशवाडी परिसरातील भिमराव शिरसाळे यांच्या निवासस्थानी आगमन होणार असून महाआरती, महाप्रसाद व दुसर्या दिवशी महाभिषेक असे धार्मिक कार्यक्रम होणार आहे. स्वामी भक्तांनी दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. १२ रोजी सायंकाळी ५ वाजता पालखीचे भुसावळकडे प्रस्थान होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.