जळगाव प्रतिनिधी । रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या तिकिटाचा सस्पेन्स आता शिगेला पोहचला असून याबाबत येत्या काही दिवसांमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत मुंबईत आज नेमक्या काय घडामोडी घडल्या आहेत याचा खास आतल्या गोटातील माहितीनुसार घेतलेला एक्सक्लुझीव्ह आढावा.
अगदी एक महिना आधीपर्यंत जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अनुक्रमे ए.टी. पाटील आणि रक्षा खडसे यांच्याशिवाय भाजपकडे कुणी स्पर्धेत असेल याची सर्वसामान्यांना कल्पनादेखील नव्हती. तर पडद्याआड आधीच याबाबत जोरदार मोर्चेबांधणी सुरू होती. मात्र मध्यंतरी व्हायरल झालेल्या एका कथित प्रकरणामुळे सर्व समीकरणे बदलली. यानंतर आता दस्तुरखुद्द एकनाथराव खडसे यांनीच थेट मुकेश अंबानी यांच्यावर आरोप करून पुन्हा एकदा आपल्याला मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहिल्याचा परिणाम भोगावा लागल्याचे वक्तव्य केल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे आता जळगाव आणि रावेरात नव्याने समीकरणे उदयास येण्याची शक्यता असून आज मुंबईत यासाठी संबंधीतांनी जोरदार मोर्चेबांधणी केली. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी अभियंता प्रकाश पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. उच्चशिक्षित व अत्यंत कर्तबगार असणारे प्रकाश पाटील हे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत. खुद्द महाजन यांनी त्यांच्यासाठी शब्द टाकल्यामुळे साहजीकच ते स्पर्धेत पुढे आहेत. यात भाजपचे अन्य नेते आणि सहकारी पक्ष असणार्या शिवसेनेतील नेत्यांच्या पाठींब्याचा विचार केला असता, प्रकाश पाटील यांना त्यांच्या सर्वपक्षीय मैत्रीचा लाभ होऊ शकतो. तर भाजपमधील गटातटाशी कोणताही संबंध नसल्याचा लाभ त्यांना मिळणार आहेच. दरम्यान, आधी स्पर्धेत असणार्या उदय वाघ आणि आमदार उन्मेष पाटील यांनी अनुक्रमे सौ. स्मिताताई वाघ आणि करण पवार यांचे नाव पुढे केले आहे. यातील स्मिताताई या आधीच आमदार असून त्यांचे पती हे जिल्हाध्यक्ष असल्यामुळे त्यांना तिकिट मिळण्याची शक्यता तशी कमी मानली जात आहे. बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेच्या समन्वयक प्रा. अस्मिता पाटील यांनीही शेवटच्या टप्प्यामध्ये जोर लावला आहे. तथापि, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी मध्यंतरी पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये भाग न घेतल्याचा फटका त्यांना बसू शकतो. यामुळे निर्णायक टप्प्यामध्ये प्रकाश पाटील व करण पवार ही नावे शॉर्ट लिस्टमध्ये असून ना. गिरीश महाजन हेच तिकिट फायनल करणार आहे. त्यांचा ‘शब्द’ उमेदवार निश्चित करणार ही बाब उघड आहे.
तर, दुसरीकडे रावेर तालुक्यातील सावदा येथे एकनाथराव खडसे यांनी थेट मुकेश अंबानी आणि सोबत पक्षाच्या नेतृत्वावरच टीका करणारे वक्तव्य केल्याची बाबदेखील मुंबईत गांभिर्याने घेतली गेल्याचे आज दिसून आले. जर शेवटच्या टप्प्यात खडसे व त्यांच्या स्नुषा खासदार रक्षाताई यांनी पक्ष बदलाचा आकस्मिक निर्णय घेतला तर तातडीने डॅमेज कंट्रोल करून तगडे आव्हान देणारा उमेदवार उभा करण्यावर आज मुंबईत मंथन करण्यात आले. यामुळे पर्यायी उमेदवारांमध्ये आमदार हरीभाऊ जावळे, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन व भुसावळचे माजी नगरसेवक अजय भोळे यांच्या नावांवर विचार करण्यात आला आहे. खडसेंनी काही हालचाली केल्यास यांच्यापैकी एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते. साधारणपणे दोन-तीन दिवसांमध्ये जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघाबाबत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.