जळगाव प्रतिनिधी | बंडखोरांवर कारवाई झालीच पाहिजे, मग तो भाजपचा असो की शिवसेनेचा, आम्ही बंडखोरी केली असेल गद्दारी केली असेल तर मला गोळी मारा, जोड्याने मारा, मी पाच वर्षे जनतेची कामे यासाठी करतो का ? असा संतप्त सवाल राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज (दि.१३) येथे केला. एवढेच नव्हे तर, अशी दगाबाजी मुळीच खपवून घेणार नाही, असे देखील त्यांनी ठणकावून सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बंडखोरांवर कारवाई का होत नाही ? ते उघडपणे भाजपा अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून गळ्यात पक्षाचे पट्टे घालून फिरत आहेत. याचा अर्थ काय ? आम्ही मात्र लोकसभेच्या वेळी उन्मेष पाटील यांना खांद्यावर घेवून नाचत होतो. तुम्ही दोनवेळा उमेदवार बदलला तरी आम्ही तुमच्या पाठीशी कायम राहिला, त्याचे हेच फळ आहे का ?. अशी गद्दारी करून तुम्ही कार्यकर्त्यांचे राजकीय करिअर खराब करताय, हे मुळीच सहन करणार नाही, अशा शब्दात ना. पाटील यांनी संताप व्यक्त केला.