धक्कादायक : शासकीय कार्यालयातून दोन संगणक चोरीला; तक्रार दाखल करण्यास पोलीसांकडून टाळाटाळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयातून दोन महत्त्वाचे संगणक संच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगणक चोरी संदर्भात तक्रार दाखल करण्यास जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे नकार देत असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रफिक तडवी यांनी शनिवारी २९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता माहिती दिली आहे.

अधिक माहिती अशी की, चोरीला गेलेल्या दोन संगणक हे जिल्हा कार्यालयाच्या कामकाजासाठी वापरण्यात येत होते. नव्याने आलेल्या संगणकांची नोंद करण्यासाठी ११ मार्च २०२५ रोजी पेंटरला बोलावले असता, हे दोन संगणक कार्यालयातून गायब असल्याचे निदर्शनास आले. कार्यालयाने आंतरिक तपासणी केली असता, हे संगणक सखी वन स्टॉप सेंटर, जळगाव येथे कंत्राटी सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शुभम हिरालाल परदेशी यांनी आपल्या काकांच्या सांगण्यावरून घरी चोरून नेल्याचे समोर आले. विशेष म्हणजे शुभम परदेशी यांचे काका विजयसिंग इंदलसिंग परदेशी हे त्या वेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पदावर कार्यरत होते.

या चोरीच्या तक्रारीसाठी संबंधित अधिकारी आणि इतर तीन कर्मचारी जिल्हापेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे गेले असता, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. पोलिसांकडून तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. चोरीच्या प्रकरणात आरोप झालेल्या शुभम परदेशी यांचे भाऊ आणि वहिणी पोलिस खात्यात कार्यरत असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे.

Protected Content