जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील स्मशानभूमीत एक अत्यंत धक्कादायक आणि अमानुष घटना उघडकीस आली आहे. तीन दिवसांपूर्वी अंत्यसंस्कार झालेल्या एका वृद्ध महिलेच्या मृतदेहावरील अंदाजे दीड ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन्यांसह अस्थी आणि राख अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा संतापजनक प्रकार गुरूवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शिरसोली परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील रहिवासी असलेल्या सुमनबाई चावदस पाटील यांचे मंगळवार ९ डिसेंबर २०२५ रोजी निधन झाले होते. बुधवार १० डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले होते. हिंदू परंपरेनुसार, अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी अस्थी गोळा करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक गुरूवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता स्मशानभूमीत आले.

यावेळी त्यांना मोठा धक्का बसला. मयत सुमनबाई पाटील यांच्या डोक्याखालील भागाची राख आणि अस्थी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे आढळून आले. इतकेच नव्हे, तर अंत्यसंस्कारादरम्यान मृतदेहावर असलेले सुमारे दीड ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेही अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते.
या अमानवी चोरीच्या प्रकारामुळे पाटील कुटुंबीयांसह शिरसोलीतील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. स्मशानभूमीसारख्या पवित्र स्थळी अशी घृणास्पद घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी तातडीने या अज्ञात आणि माणुसकीहीन चोरट्याला पकडून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी घटनेची दखल घेऊन तपास सुरू केला आहे.



