Home क्राईम धक्कादायक : इन्स्टाग्रामवर ठेवलेलं ‘ते’ स्टेटस ठरलं शेवटचं; तरूणाचं टोकाचं पाऊल !

धक्कादायक : इन्स्टाग्रामवर ठेवलेलं ‘ते’ स्टेटस ठरलं शेवटचं; तरूणाचं टोकाचं पाऊल !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शासकीय वसतिगृहातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या १८ वर्षीय रोहित समाधान पवार या विद्यार्थ्याने मंगळवारी १७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता राहत्या खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. रोहितच्या या टोकाच्या पावलामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पवार हा मूळचा धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथील रहिवासी होता आणि जळगाव येथील शासकीय आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता. आज मंगळवारी १७ मार्च रोजी सकाळी त्याचे वडील समाधान पवार आणि काका त्याला भेटण्यासाठी वसतिगृहात आले होते. त्यावेळी ‘पोटात दुखत असल्याने कॉलेजला गेलो नाही’ असे रोहितने वडिलांना सांगितले होते. वडील गावी परतल्यानंतर काही तासांतच ही दुर्दैवी घटना घडली. दुपारी ३ वाजेच्या सुमारास रोहितचा रूममेट सागर शिरोळ कॉलेजवरून परतल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासाअंती त्याला मृत घोषित केले.

इन्स्टाग्राम स्टेटसने वाढवलं गूढ :
आत्महत्येपूर्वी रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक सूचक स्टेटस ठेवले होते. त्यात त्याने म्हटले होते की, “इन्स्टाग्राम अकाउंटला समस्या येत असल्याने आजपासून अकाउंट बंद करत आहे. कोणीही मेसेज करू नये, कोणाला काही वाईट मेसेज गेले असतील तर माफ करा.” या स्टेटसमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर रोहितच्या वडिलांनी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सध्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound