जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर मध्ये राहणाऱ्या एका विवाहितेने राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी 24 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती, या संदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. सोनाली दिपक दाभाडे वय 36 आणि तेजस्विनी दीपक दाभाडे वय-8 असे मयत झालेल्या मायलेकीचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरामध्ये दीपक दाभाडे हे आपल्या पत्नी व मुलगी यांच्या सहवास्तव्याला आहेत. फॅब्रिकेशनचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. याच ठिकाणी तीन मजली इमारतीत ते इतर दोन भावांसह वास्तव्याला आहेत. दीपक दाभाडे हे आज भुसावळ येथे नातेवाईकांकडे गेलेले असताना त्यांची पत्नी सोनाली दाभाडे व त्यांची मुलगी तेजस्विनी दाभाडे हे घरी एकटे होते. त्यावेळी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सोनाली दाभाडे यांनी आपल्या मुलीला गळफास दिला. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह खाली उतरून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.