धक्कादायक : नशासाठी पैसे मागणाऱ्या मुलाकडून बापावर चाकूहल्ला !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  नशा करण्यासाठी १०० रूपये दिले नाही म्हणून पोटच्या मुलाने बापावर चाकू हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना गेंदालाल मिल परिसरात गुरूवार १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, चालक म्हणून काम करणारे संतोष वामन लिंगायत (५०, रा. गेंदालाल मिल) हे गेंदालाल मिल परिसरात कुटुंबासह राहतात. गुरुवार, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ते घरी असताना त्यांच्याकडे मुलाग महेश संतोष लिंगायत (२३, रा. गेंदालाल मिल) याने नशा करण्यासाठी १०० रुपये मागितले.

त्या वेळी नकार दिल्याचा राग आल्याने महेश लिंगायत याने वडील संतोष लिंगायत यांच्या छातीवर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली. जखमी झालेल्या संतोष लिंगायत यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

त्यानुसार  शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून महेश लिंगायत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजकुमार चव्हाण करीत आहेत.

Protected Content