यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील चुंचाळे गावात एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. भरवस्तीत एका अज्ञात महिलेने एक दिवसाच्या स्त्री जातीच्या नवजात अर्भकाचा मृतदेह फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हे क्रूर कृत्य कोणी केले असावे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
या घटनेची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. २१ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास चुंचाळे येथील विलास भावलाल पाटील हे आपल्या शेतात जात असताना, त्यांच्या घराशेजारी मोकळ्या जागेत काही कुत्रे जमिनीवर पडलेली एक वस्तू चाटताना दिसले. पाटील यांनी कुत्र्यांना हाकलून दिले आणि जवळ जाऊन पाहिले असता त्यांना एक दिवसाचे नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळून आले.

या घटनेनंतर विलास पाटील यांनी तात्काळ गावात चौकशी केली, परंतु याबाबत काहीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी यावल पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अशा प्रकारची घटना गावात प्रथमच घडल्याने नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे. समाजातील काही विकृत प्रवृत्तींमुळे अशा घटना घडत असल्याचे मत अनेकजण व्यक्त करत आहेत. पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीला अटक करावी अशी मागणी जोर धरत आहे. या घटनेमुळे स्त्रीभ्रूण हत्येसारख्या सामाजिक दुष्कृत्यांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला गेला आहे.



