पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्याच्या मावळ तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या महिलेसह तिच्या दोन मुलांना तिच्याच प्रियकराने संपवले आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत.
विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या महिलेचा गर्भपात करण्यासाठी आरोपी गजेंद्र दगडखैर याने तिला रुग्णालयात नेले होते. मात्र रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा प्रियकर आणि त्याचा मित्र यांनी या महिलेचा मृतदेह नदीत फेकून दिला. ही सर्व घटना तिच्या मुलांनी डोळ्यासमोर पाहिली आणि आरडाओरड सुरू केला. त्यानंतर आरोपी प्रियकर आणि त्याच्या मित्राने या दोन्ही मुलांना देखील त्याच वाहत्या पाण्याच्या प्रवाहात फेकून दिले.
6 जुलैला गर्भवती महिला आणि तिच्या दोन मुलांना घेऊन तिचा प्रियकर गजेंद्र कळंबोली येथे गेला होता. तेथील एका खाजगी रुग्णालयात प्रेयसीचा गर्भपात केला. मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी गजेंद्र आणि त्याच्या मित्रांने मृतदेह मावळ येथे आणला आणि इंद्रायणी नदीच्या वाहत्या पाण्यात फेकून दिला. सर्व घटना तिचे दोन्ही मुलं पाहत होते. घटनेनंतर दोन महान मुलांनी हंबरडा फोडला. त्यानंतर आरोपींनी मुलांनाही पाण्याच्या प्रवाहात फेकून दिले.
मृत महिला घरी न परतल्यामुळे ती हरवली असल्याची फिर्याद तळेगाव एमआयडीसी पोलिसांत तिच्या कुटुंबीयांनी दिली होती. या संदर्भात तपास करत असताना पोलिसांना महिला प्रियकर गजेंद्र आणि त्याच्या मित्रासोबत फोनवर वारंवार संभाषण करत होती हे समोर आले. त्यानंतर तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. त्यावेळी आरोपींनी गुन्हाची कबुली दिली. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.