जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अयोध्या नगरात राहाणारे किराणा दुकान व्यावसायिक ज्ञानेश्वर तुकाराम पाटील (वय ५२) यांना गुंगीचे औषध देवून त्यांच्याजवळील ११ लाख २० हजारांची रोकड लांबविल्याची धक्कादायक घटना बुधवारी ३१ जुलै रोजी उघडकीला आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे की, ज्ञानेश्वर पाटील हे आपल्या पत्नीसह अयोध्यानगरात किराणाचा व्यवसाय करतात, त्यांच्या दोन मुली शिक्षणानिमित्त बाहेर आहेत. किराणासोबतच दुधविक्रीचीही एजन्सी त्यांनी घेतली आहे. दुध विक्रीच्या एजन्सीचे पैसे देण्यासाठी ते मंगळवारी ३० जुलै रोजी बोदवड येथे जात होते. त्यांनी शहरातील ट्रान्सपोर्टनगरातील एका बँकेतून मंगळवारी ३० जुलै रोजी दुपारी १ वाजता ११ लाखांची रक्कम काढली. मात्र, त्यानंतर त्यांची शुद्धच हरपल्याचे सांगितले.
बँकेतून पैसे काढल्यानंतर बँकेच्या आवारातच एका व्यक्तीने ही बँक आहे का..? असे विचारले. त्यावर त्यांनीही बँक असल्याची माहिती दिली. मात्र, त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील यांची शुद्धच हरपली. ज्ञानेश्वर पाटील हे रात्रीपर्यंत घरी आले नसल्याने व त्यांचा फोनही आला नसल्याने त्यांच्या पत्नीने त्यांच्याशी संपर्क केला. मात्र, तो होऊ शकला नाही. त्यातच त्यांच्या दुकानातील काही कर्मचाऱ्यांनीही संपर्क केला असता होत नव्हता. तर दुसरीकडे बोदवड येथे ही ते पोहचले नव्हते. यामुळे नातेवाईकांची चिंता वाढली. म्हणून त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मिसींगची नोंद केली.
पोलिसांकडून तपास सुरु झाल्यानंतर ज्ञानेश्वर पाटील यांची दुचाकी ट्रान्सपोर्टनगरातील बँकेजवळ आढळून आली. तर मोबाईल जामनेर येथे एका व्यक्तीला रस्त्यावर पडलेला आढळला. मात्र, रात्री उशीरापर्यंत ज्ञानेश्वर पाटील यांचा पत्ता लागलाच नव्हता. त्यामुळे नातेवाईकांनीही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते आढळले नाही. बुधवारी ३१ जुलै रोजी सकाळी नातेवाईकांनी शोध घेतला, मात्र पत्ताच लागला नाही. दुपारी १ वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे या गावातील एका शेतालगतच्या नाल्याच्या ठिकाणी ज्ञानेश्वर पाटील आढळून आल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. नातेवाईकांनी तातडीने एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, किशोर पाटील, छगण तायडे व किरण पाटील हे घटनास्थळी गेले. त्यावेळी ज्ञानेश्वर पाटील यांचे हात-पाय बांधलेले होते. त्या शेतकऱ्यानेच ज्ञानेश्वर पाटील यांना शेतातून बाहेर आणले. ज्ञानेश्वर पाटील यांनी बँकेतून काढलेली ११ लाख २० हजार रुपयांची रक्कम अज्ञातांनी लांबविली असल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आली.पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.