
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील खेडी भागात वास्तव्यास असणार्या एकाने रात्री आपल्या पत्नीवर कुर्हाडीने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. खून केल्यापासून आरोपी पती फरार झाला होता. मात्र, आज सकाळी त्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
याबाबत माहिती अशी की, खेडीतील आंबेडकर नगरात राहणारे समाधान रमेश साळवे (वय ३५) व सोनी समाधान साळवे (वय -३० दोघी रा. धारशिरी, पाळधी, ह.मु. खेडी) हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. रात्री दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे जेवण करून दोघे जण झोपले होते. पहाटे दोन वाजता समाधान साळवेने घरात असलेल्या लोखंडी कुर्हाडीने पत्नी सोनीबाई तिच्या गळ्यावर जोरदार वार करून तिची हत्या केली होती. पत्नीचा खून करुन संशयित आरोपी समाधानने देखील रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास असोदा रेल्वे गेट येथे रेल्वे रुळाजवळ उघडकीस आले. त्याचा मृतदेह जिल्हा वैद्यकिय महाविदद्यालयात आणण्यात आला आहे.
यावेळी विभागीय पोलीस अधिकारी नवटके यांनी जिल्हा रुग्णालयात भेट दिली. दरम्यान, संशयित आरोपी समाधान साळवे याचे वडील रमेश साळवे हा देखील खूनच्या गुन्ह्यात जेलमध्ये असल्याचे कळते. मयताच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. खून झाल्याची बातमी पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. याठिकाणी एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, दीपक कांडेलकर, राजेंद्र चौधरी यांच्यासह पोलीस कर्मचारी जिल्हा रुग्णालयात उपस्थित होते. यावेळी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात एकच गर्दी जमली होती.