धक्कादायक ! वसतिगृहातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अकोला शहरातील एका प्रख्यात शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात एका १४ वर्षीय मुलीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली. याप्रकरणी सिव्हील लाइन्स पोलिसांनी अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थ्यांसह एका सेल्समनला अटक केली आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील मोठी उमरी भागातील रहिवासी असलेल्या एका महिलने तिच्या १४ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला कलम ३६३ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला होता. दुस-याच दिवशी ही मुलगी घरी परतली. तिने तिच्यावर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचे सांगितल्यावर आईच्या पायाखालची जमीनच सरकली.

तत्काळ आईने पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सामूहिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासात प्राप्त माहितीनुसार पीडित मुलीला अनुराग मनोहर चौधरी (२०, रा. यावल, जि. जळगाव) याने दुचाकीवर बसवून शहरातील रामदास पेठ हद्दीमधील एका महाविद्यालयाच्या वसतिगृहात नेले. तेथे आरोपी अनुराग, त्याचा मित्र दीपक विठ्ठल मडावी (२५, रा. सिंधी कॅम्प, अकोला), तसेच अंकुश विलास वक्टे (२५, रा. कौलखेड, अकोला) यांनी मिळून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. आरोपींपैकी अनुराग व दीपक हे अभियांत्रिकीचे विद्यार्थी असून अंकुश सेल्समनचे काम करतो.

याप्रकरणात सदर मुलीचे बयान सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यातील महिला अधिकारी कर्मचा-यांसमोर नोंदवण्यात आले. त्याने तिने घटनाक्रम सांगितला. त्यातून प्रकरणाचा उलगडा झाला. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी कलम ३७६, ३७६ दोन एल, ३७६ तीन, ३७६ आय, ३७६ डी.ए., ३,४,६,१२ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Protected Content