धक्कादायक : नवजात स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने खळबळ; यावल पोलीसात गुन्हा

यावल प्रतिनिधी । सांगवी ते भालोद रस्त्यावर एका शेताजवळ नवजात स्त्री जातीचे अर्भक सोडून अज्ञात मातेने पलायन केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीला आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील सांगवी ते भालोद रस्त्यावरून काही शेतमजूर आज मंगळवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेतात कामाला जात असतांना वाटेत असलेले हरी बोरोले यांच्या शेताजवळ काटेरी झुडपात एका लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला. यावेळी मजूरांनी पाहणी केली असता त्यांना नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. याघटनेमुळे यावल परिसरात खळबळ उडाली आहे. मजूरांनी तातडीने यावल पोलीसांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नवजात बालकाला उचलून तातडीने ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. याप्रकरणी शेतमजूर महिला लक्ष्मी धनराज भिल (वय-२६) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात माता पित्यावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अजमल पठाण करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!