जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील जळके ते लोणवाडी रस्त्यावर अज्ञात दोन जणांनी ८० वर्षीय वयोवृध्दाच्या हातातून सोन्याची चैन व अंगठी असा एकुण १ लाख २६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरी हिसकावून चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शामराव लोटु तायडे (वय-८०) रा. दौलत नगर, मोहाडी रोड जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ३० मे रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास शामराव तायडे हे दुचाकीने जळके येथून लोणवाडी येथे जात असताना रस्त्यावरील संदीप पाटील यांच्या शेताजवळ अज्ञात दोन जण दुचाकीने घेऊन त्यांना हात देऊन थांबविले. दोन अज्ञातांनी सांगितले की, या रस्त्यावर चोऱ्या जास्त होतात, असे सांगून गळ्यातील सोन्याची चैन व हातातील अंगठी रुमालात गुंडाळून गाडीचा डीक्कीत ठेवा. त्यानुसार शामराव तायडे यांनी सोन्याची अंगठी गाडीच्या डिक्कीत ठेवत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील रुमालात ठेवलेले सोन्याची चैन व सोन्याची अंगठी जबरी हिसकावून मुद्देमाल पोबारा केला. याप्रकरणी शामराव तायडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी ३० मे रोजी सायंकाळी ८ वाजता अज्ञात दोन जणांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.