जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण येथील विद्या इंग्लिश मिडीअम स्कूलच्या प्रशासनाने शाळेची फी न भरलेल्या ५० विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत शाळेच्या बाहेर बसविल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी १३ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता घडला आहे. शाळा प्रशासनाच्या कारभारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मेहरूण परिसरात विद्या इंग्लिश मीडियम स्कूल आहे. शाळेची फी न भरणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना शुक्रवारी १३ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता कडाक्याच्या थंडीत बसविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जोवर तुम्ही शालेय फी भरत नाही तोवर वर्गात बसू देणार नाही असे प्राचार्य हॅरी जॉन्सन यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्याप्रमाणे काही पालकांनी आपल्या मुलांना घेऊन घरी निघून गेलेत, मात्र काही विद्यार्थी शाळेच्या पटागणात बसून होते. यासंदर्भात पत्रकार यांनी जाब विचारला असता प्राचार्य यांनी अरेरावी केली. आणि विद्यार्थ्यांना पटांगणात बसवून ठेवले होते. याप्रसंगी पत्रकारांनी त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यावेळी पालकांनी देखील भेटण्यासाठी आले असता त्यांना मज्जाव करण्यात आला व थेट शाळेच्या गेटच्या बाहेर काढण्यात आले. इयत्ता सातवी, आठवी आणि नववीच्या वर्गात असलेल्या विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.