जळगाव प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत आज पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सकाळपासून सुरु आहेत. प्रत्येक मतदारसंघातील आजी-माजी आमदारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. परंतू जळगाव ग्रामीणमधील इच्छुकांच्या नावात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत आज पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सकाळपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढण्याबाबत पक्षाकडे विनंती केलेली आहे. यानुसार विद्यमान आमदार डॉ.सतीष पाटील, माजी आमदार राजीवदादा देशमुख, दिलीप वाघ, जगदीश वळवी यांनी उमेदवारी मागितली आहे. परंतू जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव देवकर यांचे नाव इच्छुकांच्या यादीत नाहीय. घरकुलचा निकाल लागल्यावरच देवकर आपले पत्ते उघडतील,अशी शक्यता आहे. किंबहुना देवकर यांच्या मनात काही वेगळे गणित सुरु आहे का? याबाबत चर्चेला उधान आले आहे.
दरम्यान, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून कल्पिता रमेश पाटील,अरविंद भिमराव मानकरी,जितेंद्र बाबुराव देशमुख,कल्पना गरिबदास आहिरे, ज्ञानेश्वर भादू महाजन, पुष्पा ज्ञानेश्वर महाजन, संदिप विजय पवार व संजय मुरलीधर पवार हे इच्छुक आहेत. यातील बहुतांश इच्छुक हे संजय पवार गटाचे आहेत. त्यामुळे भविष्यात आम्ही माघार घेतो. संजय पवार यांना उमेदवारी द्या, अशी खेळी पवार गट खेळण्याची शक्यता आहे.