चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकीवरून लाकडे घेवून जात असतांना बसचा धक्का लागल्याने रोडच्या बाजूला असलेल्या गिरणा नदी पात्रातील दगडावर पडल्याने ५४ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरूवार २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता बहाळ गावाजवळ घडली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भागवत रामराव देवरे वय-५४ रा. बहाळ ता. चाळीसगाव असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील बहाळ गावात भागवत देवरे हे वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गुरूवार २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता ते दैनंदिनीसाठी लागणारे लाकडे घरी घेवून जाण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीएच ६१९०) ने घरी जाण्यासाठी निघाले. गिरणा नदीपात्राजवळील अरूंद रस्त्यावरून दुचाकीने जात असतांना त्यांना समोरून येणारी बसचा दुचाकीला धक्का लागला. त्यावेळी त्यांचा दुचाकीवरील तोल गेल्याने ते दुचाकीसह गिरणा नदीपात्रात पडले. त्यात ते दगडावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री ८ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेमुळे बहाळ गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.