धक्कादायक : स्पर्धा परीक्षेत केवळ तीन गुण कमी पडल्याने तरुणानं केलं असं काही…

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एमपीएससीच्या क्लर्कच्या परीक्षेत केवळ तीन गुण कमी पडल्याने, शिरसोली येथील विद्यार्थ्याने शुक्रवारी १७ मे रोजी रात्री ८ वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आकाश भिमराव बारी (वय-२५) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आकाश गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. या आधी देखील आकाशने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अनेक परीक्षा दिल्या होत्या. मात्र त्या परीक्षांमध्ये सातत्याने अपयश येत असल्याने आकाश मानसिकरित्या खचला होता. त्यात गुरुवारी १६ मे रोजी एमपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या मंत्रालयीन क्लर्क पदासाठीचा परीक्षेच्या निकाल जाहीर झाला. या परीक्षेमध्ये आकाशला तीन गुण कमी पडल्याने त्याची संधी हुकली. या अपयशामुळे आकाश अधिकच खचला, शुक्रवारी १७ मे राजी रात्री त्याच्या घरातील एका खोलीत आकाशने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री ८ वाजता आकाशचा मोठा भाऊ सुरज हा कंपनीतून घरी आल्यानंतर, त्याला शेजारच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आकाश आढळून आला, लागलीच त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. आकाशच्या पश्चात आई, मोठा भाऊ व वहिनी असा परिवार आहे. आकाशच्या मोठ्या भावाचे गेल्या महिन्यातच लग्न झाले होते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र आकाश च्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळल्याने, बारी कुटुंबाच्या आनंदावर विरंजन पडले आहे.

Protected Content