नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । नाशिकमधून मनसेला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमधून प्रथमच मनसेचे आमदार म्हणून निवडून आलेले नितीन भोसले यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला असून यामुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादीला बळ मिळाले आहे.
एकीकडे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटाकडून राज्यभरात जोरदार बैठक सभांचे आयोजन करण्यात येत आहे. दोन्ही गटाकडून महाराष्ट्र पिंजून काढला जात आहे. अनेकजण नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी कुणी घरवापसी तर कुणी नवा प्रवेश सोहळा करत आहेत. नाशिकमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळाले आहे. मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला आहे.
नितीन भोसले हे २००६ पासून मनसेत काम करत होते. आठ वर्षे शहराध्यक्ष होते. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तीन आमदार नाशिक शहरात निवडून आले होते. त्यात नितीन भोसले हे पश्चिम नाशिक मतदार संघातून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्येही त्यांनी निवडणूक लढवली मात्र, त्यांना यश आले नव्हते. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी मध्यंतरी भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली होती. मात्र, नाशिक महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांची भाजप नेते गिरीश महाजन यांच्याशी भेट झाल्यानंतर वातावरण बदलले आणि भाजप उमेदवार सतीश कुलकर्णी यांना मतदान करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे नितीन भोसले यांनी नाराज होऊन तटस्थ राहणे पसंत केले होते. त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामुळे नाशिकमध्ये आता राष्ट्रवादीला बळ मिळाली आहे. नुकतेच माजी आमदार नितीन भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.