बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवार गटात प्रवेश करताना दिसत आहेत. अजित पवार गटाचे सिंदखेडराजाचे आमदार राजेंद्र शिंगणे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. वर्ध्यातील एका कार्यक्रमात शरद पवारांच्या उपस्थितीत राजेंद्र शिंगणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आपण अजित पवार यांच्यासोबत नाईलाजामुळे गेल्याचे, मात्र शरद पवारांना नेते मानत आल्याचे राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे.
वर्ध्यात माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांचे तोंडभरून कौतुक करत आपण आयुष्यभर शरद पवार यांचे ऋणी राहणार असल्याचे म्हटले. त्याचबरोबर अजित पवार गटासोबत जाण्याचे कारणही सांगितले. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, जरी मी अजित पवारांच्या गटात सामील जरी झालो असलो तरी शरद पवारांशी संबंध तोडले नाहीत. आजही मी त्यांना नेता मानतो. मागच्या २ वर्षात वेळोवेळी जाहीर भाषणातून आणि वैयक्तिक बोलण्यातून शरद पवारांचा आदर केला आहे. राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अजित पवारांनी बंड केल्यानंतर राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवारांच्या गटात जाण्याच्या निर्णय घेतला होता.