जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवशाहीर, ज्येष्ठ शिवचरित्रकार तथा जळगावच्या सांस्कृतीक व सामाजिक क्षेत्रातील आघाडीचे मान्यवर म्हणून ख्यात असलेले दुर्गादास उर्फ दादा नेवे यांचे निधन झाले असून आज दुपारी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
दुर्गादास उर्फ दादा नेवे ( वय ७४ ) यांचे आज निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून ते व्याधीग्रस्त होते. जळगावातील मोठे व्यक्तीमत्व म्हणून ख्यात असलेले दादा नेवे यांनी सांस्कृतीक आणि सामाजिक उपक्रमांना मोठी गती दिली होती. जळगाव पीपल्स बँकेचे संचालक म्हणून देखील त्यांची कारकिर्द लक्षणीय ठरली.
तब्बल सव्वाशे वर्षांची परंपरा असणार्या नेवे ब्रदर्स या फर्मची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळून हा वारसा पुढील पिढीला सुपुर्द केला. जळगावात जाणता राजा महानाट्याच्या आयोजनात त्यांचा मोलाचा वाटा होता. छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानणार्या दादा नेवे यांनी असंख्य ठिकाणी शिवचरित्राच्या माध्यमातून शिव विचारांचा जागर चेतविण्याचे काम केले. त्यांच्या जाण्याने एक महनीय व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. लाईव्ह ट्रेंडस न्यूजतर्फे त्यांच्या महान कार्याला मानाचा मुजरा आणि त्यांना आदरांजली !