शिवसेनेचा अजून एक आमदार एकनाथ शिंदेंसोबत !
मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आजवर शिवसेनेसोबत असलेले आमदार संतोष बांगर हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे दिसून आले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ३९ आमदारांसह पक्षात उभी फूट पाडली. यानंतरच्या राजकीय नाट्यानंतर ते स्वत: मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असून फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनले आहेत. शिंदे यांनी आपल्यासोबत अजून काही आमदार येणार असल्याची घोषणा केली होती. यानुसार आज पुन्हा एक आमदार त्यांच्या गळाला लागला आहे.
आमदार संतोष बांगर हे आज एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे बांगर हे अर्ध्यातून शिवसेनेत परतल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. त्यांनी बंडखोरांवर प्रखर टीका देखील केली होती. त्यांनी काल शिवसेनेचे राजन साळवी यांना देखील मतदान केले होते. तर आज सकाळी ते एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या बसमधून विधानसभेत गेलेत. यामुळे शिंदे गटात आता एकूण ४० आमदार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.