भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील बहुतेक भागात वीज वितरण कंपनीकडून जुने विद्युत मीटर बदलवून नवे मीटर बसविण्यात आले आहेत, या नव्या मीटरचा वेग अधिक असल्याने ग्राहकांना जादा रकमेची देयके (बिल) मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महिन्याला २०० ते ४०० रुपये वीज देयक येणाऱ्या ग्राहकांना चक्क हजार रुपयांची देयक येवू लागली असून ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज (३ जून) रोजी सकाळी १० वाजता कार्यकारी अभियंता प्रदीप घोरूडे यांच्या कार्यालयात ग्राहकांसोबत शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन केले.
यावेळी कार्यकारी अभियंता नसल्याने अतिरिक्त अभियंता व्ही.बी.पाटील यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवण्यात आला, त्यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा झाली.
वीज वितरण कंपनीने जुने मीटर बदलण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम काही महिन्यांपूर्वी हाती घेतला होता. दोन-तीन वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले मीटरही यात बदलण्यात आले. त्यामुळे मीटरमधून होणा-या वीज विक्रीचे प्रमाण निश्चितच वाढेल, असा वीज वितरणचा विश्वास होता. झालेही तसेच मात्र हे मीटर फारच सेन्सिटिव्ह असल्याने घरातील जुनी वायरिंग, जुने फ्रीज व घरगुती मोटार यात किंचितसा बिघाड असल्यास सुद्धा मीटर धावत राहते, त्यामुळे भरमसाठ वीज बिले ग्राहकांना मिळाली. बऱ्याचदा उपकरणे बंद असतानाही मीटरचे युनिट पुढे पडत राहतात अशाही नागरिकांच्या तक्रारी आहेत.
भुसावळ शहरात ज्यांनी मीटर बदलण्यास सकारात्मक प्रतिसाद देत असे नवीन आर एफ मीटर वीज वितरणला बसवू दिले त्यांना हा भुर्दंड सोसावा लागत असून ज्यांनी दांडगाईने नवीन मीटर बसविण्यास विरोध करून आपले जुनेच मीटर कायम ठेवले त्यांची मात्र या कटकटीतून सुटका झाली असल्याचे अनेक वीज ग्राहक सांगत आहेत. ग्राहकांकडील हे नवीन मीटरच फॉल्टी असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अतिरिक्त देयकांचा भरणा ग्राहकांना करावा लागत आहे. अश्या भावना वीज ग्राहकांनी शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या जवळ व्यक्त केल्या होत्या.
महावितरणने विजेचा काटेकोर हिशेब ठेवण्यासाठी योजिलेला हा उपाय सामन्यांच्या खिशाला नाहक कात्री लावणारा ठरला आहे. महावितरण कंपनीतर्फे बसवण्यात आलेले मीटर दोषपूर्ण आहेत, या नागरिकांच्या आक्षेपाला दररोज कंपनीकडे याबाबत येणाऱ्या तक्रारींचे वाढलेल्या प्रमाणामुळे पुष्टी मिळत आहे. भरमसाठ वीज देयकांच्या तक्रारी घेवून येणाऱ्या ग्राहकांची प्रतीदिन सरासरी संख्या शंभरहून अधिक असल्याची माहिती दक्षिण विभागाचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी संबंधित अधिकाऱ्याना दिली.
विद्युत ग्राहकांना एप्रिल-मे महिन्यात हजारो रुपयांची देयक देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत विजेचा वापर वाढत आहे. नवीन मीटरमुळे दुप्पट देयक आकारली जात आहेत. वीज कंपनीने यात तातडीने सुधारणा करावी अन्यथा जुनेच मीटर पुन्हा बसवावेत, अशी मागणी ग्राहकांमधून करण्यात येत आहे. ग्राहकांची वीज बिले रीतसर पद्धतीने वीज बिल कमी करून द्यावे, तसेच वीजतोडणी करतांना नोटीस दिलीच पाहिजे अन्यथा शिवसेनेतर्फे मोठे आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी दिला आहे. एकीकडे संपूर्ण भुसावळ शहरात नवे वीज मीटर बसविले जात असताना महावितरणच्या संबधित एकाही कार्यालयात नवे मीटर बसवले गेलेले नाहीत, संपूर्ण शहराला नवीन मीटर बसवण्याचे आवाहन करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्यांच्याच ऑफिसमधील जुने मीटर दिसले नाहीत का ? असा संतप्त सवालही ग्राहकांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी ऊर्जामंत्री ना. बावनकुळे यांच्यापर्यंत तक्रार करणार असून उच्च अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे प्रा.धिरज पाटील यांनी म्हटले आहे. या आंदोलनप्रसंगी शिवसेना पदाधिकारी समाधान महाजन, प्रा. धीरज पाटील, संतोष सोनवणे, बबलू बऱ्हाटे, निलेश महाजन, हिरामण पाटील, नबी पटेल, योगेश बागुल, विक्की चव्हाण, सुरज पाटील, मनोज पवार, मयुर जाधव, विनोद गायकवाड, शेख मेहमूद, स्वप्नील सावळे, निखिल बऱ्हाटे व अनेक ग्राहक उपस्थित होते.