मुंबई प्रतिनिधी । फडणवीस यांना पुन्हा सत्ता मिळणार असेल तर त्यांना आपल्या शुभेच्छा असल्याचा टोला मारत खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे आज पुन्हा ठाम प्रतिपादन केले.
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडल्यानंतर खासदार संजय राऊन यांनी लागलीच पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, परंपरेनुसार फडणवीस यांनी राजीनामा दिला आहे. ते आता काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार असून आम्हाला आता त्यांचीच काळजी आहे. फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेच उत्तर देणार असल्याचे राऊत म्हणाले. अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला होता याचा पुनरूच्चार राऊत यांनी केला. राम मंदिरापासून ३७० कलमापर्यंत विरोध करणार्या अनेक पक्षांची सोबत भाजपने केली आहे. तथापि, पहिल्यापासून प्रखर राष्ट्रवादाची भूमिका घेणार्या शिवसेनेबाबत भाजपने चुकीची भूमिका घेतल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. फडणवीस यांनी आरोप केल्यानुसार मोदी, शहा अथवा भाजपच्या अन्य नेत्यांबाबत खालील भाषेत टीका केल्याचा आरोप साफ चुकीचा असल्याचे ते म्हणाले. जर फडणवीस यांना पुन्हा त्यांचे सरकार येणार असल्याचे वाटत असेल तर त्यांना शुभेच्छा असल्याचा टोला राऊत मारला. आणि आम्ही प्रयत्न केल्यास शिवसेनेचा मुख्यमंत्री बनणार असल्याचे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.