मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर आज शिक्कामोर्तब झाले असून ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडीने युती करण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे.
आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती होती. यासोबत संजय राऊत, सुभाष देसाई, अरविंद सावंत आदींसह दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. यात दोन्ही पक्षांनी युती करण्याचा निर्णय जाहीर केला. शिवसेनेने या आधी देखील शिवशक्ती-भिमशक्तीचा प्रयोग २००० सालाच्या आसपास केला होता. याला मर्यादीत प्रमाणात यश देखील लाभले होते. यानंतर आता हाच प्रयोग नव्याने करण्यात आला असून आज याबाबत घोषणा करण्यात आली.
दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरे म्हणाले की, ठाकरे आणि आंबेडकर या दोन्ही घराण्यांना मोठा इतिहास आहे. आमचे आजोबा आणि प्रकाशजींचे आजोबा हे एकमेकांचे स्नेही होते. आज हा संबंध नव्याने होत आहे. देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आज आमचा पक्ष व वंचित बहुजन आघाडी येत आहोत. राजकारणातील वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी ही युती असल्याचे त्यांनी नमूद केले. तर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, निवडणुकीत एक बदलाचे राजकारण आम्ही सुरू करत आहोत. गेल्या अनेक वर्षात उपेक्षितांच्या उत्थानासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही लढत राहिलो. नात्यांच्या राजकारणामुळे आजची स्थिती आली असल्याची टीका त्यांनी केली.