मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेतील बंडखोरीबाबत ११ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असतांनाच आता शिंदे सरकारने प्राप्त केलेल्या बहुमत चाचणीसह अन्य दोन मुद्यांवरून विरोधात शिवसेनेने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
शिवसेनेच्या मालकीवरूनचा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहचला असून तेथेच या पक्षाचे भविष्य ठरणार आहे. यात शिवसेनेने शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे ही मागणी केली असून या याचि केवर ११ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीतूनच राज्यातील आगामी राजकीय चित्र स्पष्ट होणार असल्याचे मानले जात आहे. यामुळे याच्या सुनावणी आणि निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ही याचिका सुप्रीम कोर्टात असतांनाच आता शिवसेनेने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याचे वृत्त आहे. राज्यपालांनी ज्या प्रकारे शिंदे गटाला तात्काळ बहुमत सिध्द करण्यासाठी आमंत्रण दिले. आणि नंतर त्यांनी बहुमत सिध्द केले, ही प्रक्रिया संशयास्पद असून याबाबतच शिवसेनेने सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. यात सरकारची बहुमत चाचणी, राज्यपालांनी दिलेले आमंत्रण आणि विधानसभा अध्यक्षांची निवड या तिन्ही बाबींचा समावेश करण्यात आल्याची माहिती शिवसेनेतर्फे देण्यात आली आहे.