मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या सुरू असलेल्या सीमा वादावर शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सत्ताधार्यांवर जोरदार टिकास्त्र सोडले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात आज सीमा प्रश्नावर भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, बाजूचे गुजरात राज्य महाराष्ट्रातून उद्योग-व्यवसाय पळवत आहे तर कर्नाटकसारखे राज्य महाराष्ट्राचा भूभाग घशात घालण्याची भाषा करीत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सर्व मुद्द्यांवर गप्प आहेत. सरकार वाचवण्यासाठी ज्योतिष दरबारी बसले आहेत, असा टोमणाही लगावण्यात आलाय. तसेच, कर्नाटक सीमा प्रश्नावरून भाजपच्या भूमिकेवरही अग्रलेखातून शंका उपस्थित करण्यात आली आहे.
या संदर्भात अग्रलेखात म्हटले आहे की, बेळगाव कारवारसह संपूर्ण सीमा भाग महाराष्ट्रात यावा, असे महाराष्ट्र भाजपाला खरेच वाटत आहे का, ही शंकाच आहे. सीमाभागातील तरुणांना महाराष्ट्रातील विद्यापीठात राखीव जागा ठेवण्याचा निर्णय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला होता. तसा त्याग इतर कोणत्याही राजकीय पक्षाने केला नाही. राज्यात सध्या मर्दानगीचा दुष्काळ असून मनगटात सळसळ नसल्यानेच हे होत असल्याची टीका यात करण्यात आली आहे.