गिरीश महाजनांनी खोकेबाज आमदारांचे बिंग फोडले : शिवसेनेची टीका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेतील फुटीबाबत ना. गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावरून आज शिवसेनेने त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनामधील अग्रलेखात आज राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, शिवसेना फोडणे हे भाजपचे ‘मिशन’ होते व ते पूर्ण झाल्याचा आनंद गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. शिवसेनेसारखा पक्ष फोडणे कठीण होते; पण आम्ही तो फोडला, असेही महाजन म्हणाले. शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळे फुटली. शरद पवार यांनी कारस्थान करून शिवसेना फोडली असे बेइमान गटाचे आमदार बोलत होते. त्याची हवाच महाजन यांनी काढली. चाळीस आमदार व त्यांचे नेते हे स्वतःच विक्रीसाठी बाजारात उभे होते. भाजपने बोली लावली व ते फुटले. त्यामुळे सत्तांतरामागच्या कारस्थानावरील पडदा उघडला आहे. शिंदे व त्यांच्याबरोबरचा गट हा बर्‍याच काळापासून फुटण्याच्या तयारीत होता व उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा मुहूर्त त्यांनी पकडला. बाकी सर्व भाजपने ठरवल्याप्रमाणे केले. शिवसेना फोडायचीच हे भाजपने ठरवूनच टाकले होते व त्या पद्धतीने सापळा रचला.

यात पुढे म्हटले आहे की, शिवसेनेच्या फुटीनंतर फडणवीस वगैरे लोकांनी हात वर केले व या फुटीशी आमचा संबंध नसून ही शिवसेनेची अंतर्गत बंडाळी असल्याचे सांगितले. मात्र गिरीश महाजन यांनी आता हा दावा खोटा ठरवला. भाजपने त्यांचे मिशन पूर्ण केले, पण त्यासाठी महाराष्ट्राच्या अखंडतेचा व स्वाभिमानाचा बळी दिला. भाजपचे मिशन पूर्ण झाले, असे गिरीश महाजन म्हणतात ते खरेच आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांचे मिशन ठरवले म्हणून चाळीस जण ‘दाम’ लावून फुटले. क्रांतीची वगैरे भाषा झूठ आहे. शिवसेना फोडली याचा भाजपवाल्यांना इतका आनंद झाला की, राज्यपालांसह भाजपच्या अनेक तोंडपाटलांची मजल छत्रपती शिवरायांचा अपमान करण्यापर्यंत गेली. हिंदवी स्वराज्यातच शिवरायांचा अपमान करू व तो पचवून ढेकर देऊ हेसुद्धा भाजपचे एक मिशन पूर्ण झाले. महाजन यांनी चाळीस खोकेबाज आमदारांचे बिंगच फोडले व तेही मुख्यमंत्र्यांसमोर. श्री. महाजन हे ‘ईडी’, ‘सीबीआय’सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा संदर्भ द्यायला विसरले.

या अग्रलेखात शेवटी म्हटले आहे की, भाजप म्हणे गंगेसारखा आहे. त्यात डुबकी मारा आणि पापं धुऊन टाका, अशी ऑफर त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी दिलीच आहे. महाराष्ट्रातील फुटिरांच्या घरापर्यंत ‘गंगा’ नेण्याचे काम भाजपने केले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एक मत बाद करण्यासाठी पाच-दहा कोटींचे गंगास्नान घडवले गेले व त्या गंगेचे पाणी जामनेरमधून आले हे खरे नाही काय? भाजपचे मिशन हे असेच आहे. त्याने गंगा साफ मैली करून टाकली. मोदी तरी काय करणार? असा प्रश्‍न या अग्रलेखात विचारण्यात आला आहे.

Protected Content