मुंबई प्रतिनिधी | केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतल्याच्या निर्णयावरून शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्लाबोल करतांना हा निर्णय उशीरा झाल्याचा आरोप करतांनाच हा मोदींचा मास्टर स्ट्रोक असल्याची भलामण करणार्यांची खिल्ली उडविली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनामध्ये कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, संसदेत पाशवी बहुमताच्या जोरावर सरकारने कायदे मंजूर करून घेतले, विरोधकांचा आवाज दडपण्यात आला व काही झाले तरी माघार नाही अशी भूमिका पंतप्रधान मोदी यांनी घेतली. एवढेच नव्हे तर शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली पंजाब, उत्तर प्रदेश, हरयाणातील शेतकरी गाझीपूर-सिंघू बॉर्डरवर आंदोलनासाठी बसला तेव्हा त्या आंदोलनाकडे त्यांनी संपूर्ण दुर्लक्ष केले. त्या शेतकर्यांचे वीज, पाणी बंद केले. दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांच्या टोळ्या पाठवल्या. तरीही शेतकरी जागचे हटले नाहीत. तेव्हा शेतकर्यांना खलिस्तानवादी, पाकिस्तानवादी, दहशतवादी ठरवून बदनाम केले असा आरोप यात करण्यात आला आहे.
यात पुढे म्हटले आहे की, लखीमपूर खिरी येथे केंद्रीय मंत्रिपुत्राने आंदोलनकर्त्या शेतकर्यांना चिरडून मारले. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी साधा शोकही व्यक्त केला नाही. आज मात्र ङ्गशेतकरी मरू द्या, आजन्म आंदोलन करू द्या, पण सरकार एक पाऊलही मागे हटणार नाही,फ या आडमुठेपणाचा त्याग करून सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. त्यासाठी ५५० शेतकर्यांनी बलिदान दिले, दीड वर्ष ऊन-वारा-थंडी-पावसात ते रस्त्यावर लढत राहिले. हे शेतकरी मागे हटणार नाहीत व उत्तर प्रदेश, पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल या भीतीने मोदी सरकारने आता कृषी कायदे मागे घेतले. शेतकर्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे. देशात मनमानी चालणार नाही, हम करेसो कायदा हे तर त्याहून चालणार नाही, असे यात म्हटले आहे.
यात पुढे नमूद केले आहे की, महाभारतआणि रामायणात शेवटी अहंकाराचाच पराभव झाला हे सध्याचे नकली हिंदुत्ववादी विसरले व त्यांनी रावणाप्रमाणे सत्य व न्यायावरच हल्ला केला. शेतकरी लढत राहिले, शहीद झाले व शेवटी जिंकले. १३ राज्यांतील पोटनिवडणुकांत भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यातून आलेले हे शहाणपण आहे. शेतकरी खलिस्तानवादी अतिरेकी होते तर मग पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यापुढे पांढरे निशाण का फडकविले? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. निदान यापुढे तरी असे कायदे आणण्यापूर्वी केंद्र सरकारने अहंकार बाजूला ठेवावा. लखीमपूर खिरी येथे आंदोलक शेतकर्यांना भाजपच्या मंत्रिपुत्राने चिरडून मारले. त्या जालियनवाला बागसारख्या हत्याकांडाविरुद्ध सार्वत्रिक बंद पुकारणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. न्याय, सत्य आणि राष्ट्रवादाच्या लढाईत महाराष्ट्राने नेहमीच निर्भय भूमिका घेतली. यापुढेही अशी भूमिका घ्यावीच लागेल. तिन्ही कृषी कायदे मागे घेणे अखेर केंद्र सरकारला भाग पडले आहे. शेतकर्यांच्या एकजुटीचा विजय झालाच आहे. मागे हटणार नाही असे सांगणार्यांचा अहंकार पराभूत झाला, पण आताही अंध भक्त बोलतील, काय हा साहेबांचा मास्टर स्ट्रोक! असे म्हणत शिवसेनेने याची खिल्ली उडविली आहे.