मुंबई प्रतिनिधी | मोदी नावाची जादू ओसरली असून आता विरोधकांनाही मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे प्रयोग करावे लागतील असे प्रतिपादन आज शिवसेनेने केले आहे. या माध्यमातून विरोधकांच्या एकीकरणाबाबत सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनात आज पुन्हा एकदा केंद्र सरकारला टार्गेट करतांनाच विरोधकांच्या एकोप्यावरही भाष्य करणतया आले आहे. यात म्हटले आहे की, विरोधी पक्षांची एक मोट बांधून २०२४ च्या निवडणुकांना सामोरे जावे, असे विचार सुरू झाले आहेत. कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने देशातील विरोधी पक्षांची एक बैठक पार पडली. कॉंग्रेससह १९ राजकीय पक्ष या बैठकीत सामील झाले. १९ पक्ष एकत्र आले व त्यांनी विरोधी पक्षांची मोट बांधण्यासंदर्भात चर्चा केली. त्या चर्चेतून कोणते फळ हाती लागले हे महत्त्वाचे. लोकशाही आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच, पण फक्त चर्चा पे चर्चा नकोत तर देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचे आहे.
प. बंगालातील विधानसभा निवडणुकीत मोदी व शहा यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी आकाश-पाताळ एक केले. मोदींची सभा व शहांचे निवडणूक व्यवस्थापन म्हणजे विजय पताका फडकण्याची खात्रीच, हा भ्रम ममता बॅनर्जींनी धुळीस मिळवला. मोदींच्या १९ सभा होऊनही प. बंगालात ममतांचाच झेंडा फडकला व शहांचे सर्व राजकीय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन पराभूत झाले. म्हणजेच मोदी-शहा यांचा पराभव होऊ शकतो. ममता बॅनर्जी यांना जेरीस आणण्यासाठी केंद्र सरकार सीबीआय, न्यायालये व इतर सर्व यंत्रणांचा वापर आजही करीत आहेत. त्याविरोधातसुद्धा सगळयांनी एकवटले पाहिजे. राज्याराज्यांत प्रादेशिक पक्ष जोरात आहेत. ओडिशा, आंध्र प्रदेशातील सरकारे ही दिल्लीत ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या महान विचारांची आहेत, पण एकंदरीत देशातील वातावरण विरोधी पक्षांना अनुकूल होत आहे.
यात पुढे म्हटले आहे की, देशात शेतक़र्यांचा प्रश्न उभा ठाकला आहे, महागाई-बेरोजगारी आहे. पेगॅससचे गांभीर्य सरकार समजून घेत नाही, पण कधी तालिबान्यांचे भय निर्माण करायचे तर कधी पाकडयांची भीती घालून लोकांची मने तापवून भावनांचे खेळ करायचे. आज तालिबानी अफगाणिस्तानात रक्तपात घडवीत आहेत व इकडे भाजपचे लोक सांगतात, हिंदुस्थानात मोदी आहेत म्हणून तालिबानी नाहीत. बोला, भारतमाता की जय! हे असले उठवळ प्रचार करणाऱया जत्रा मंत्री-संत्री करीत आहेत. या सगळया नौटंकीविरोधात सगळयांनी एकत्र येणे गरजेचे आहे. एकत्र येणे म्हणजे फक्त चर्चांची गुर्हाळे पाडणे नाही. लोकांना पर्याय हवाच आहे. तो देण्याची क्षमता आपल्यात आहे, असा विश्वास समस्त विरोधी पक्षांनी जनतेस द्यावा लागेल. २०२४ चे लक्ष्य वगैरे ठीक आहे, पण मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे काही प्रयोग विरोधकांनाही करावेच लागतील. मोदी नामाफची जादू उतरली आहे. त्यामुळे २०२४ चा जय-पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल. त्याची तयारी, रंगीत तालीम करावी लागेल, नाहीतर जन आशीर्वादाच्या जत्राफलोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील! असा इशारा या अग्रलेखात देण्यात आला आहे.