मुंबई प्रतिनिधी । चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखे असल्याची मल्लीनाथी करत आज शिवसेनेने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना जाहीर पत्र लिहून संजय राऊत वापरत असलेल्या भाषेबाबत तीव्र आक्षेप घेतला होता. यावरच आज सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करत चंद्रकांत पाटलांवर प्रहार करण्यात आले आहेत. यात म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत, पण चायपेक्षा किटली गरम असे काही लोकांचे सुरू आहे. भाजपच्या ध्यानीमनी, स्वप्नी बिल्डरच आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही निर्णयात बिल्डरच दिसत असावेत. राज्य सरकारने कोणताही निर्णय घ्यायचा म्हटले की, ब्लॅकमेल करणारी किरकिराटी मांजरे आडवी घालायची, हे जणू धोरणच झाले आहे. तिकडे लडाखच्या हद्दीत चीनचे सैन्य घुसून त्यांनी इंचभर नाही, तर मैलोन्मैल हिंदुस्थानी जमीन कब्जात घेतली आहे. त्यावर या किटल्या का तापत नाहीत असा प्रश्न यात विचारण्यात आला आहे.
यात पुढे म्हटले आहे की, चंद्रकांत पाटील हे हल्ली वाचकांची पत्रे, तक्रारी सूचना वगैरे सदरांखाली पत्र लिहून अनेक विषयांना वाचा फोडतात. मुख्य म्हणजे भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. भाजपमध्ये नवे तर्खडकर उदयास आले असून संपूर्ण भाजपला त्यामुळे गलिच्छ विचार आणि भाषेला तिलांजली द्यावी लागेल. काही चुकीचे बोललात की, पत्रलेखक पाटील त्यांची कागदी तलवार सपकन बाहेर काढतील व तक्रारी सूचना सदरात वार करतील. ब्लॅकमेल करणेफ , बदनामी मोहिमा राबविणे हे धंदे करणे म्हणजे विरोधी पक्षाचे कर्तव्य नाही, याचे भान राज्याच्या अधिकृत विरोधी पक्षनेत्यांनी ठेवायला हवे.
अग्रलेखात पुढे नमूद केेले आहे की, शेतकर्यांना असे तडफडताना, मरताना बघणारे केंद्राचे सरकार व त्यांचा पक्ष मात्र संवेदनशील! हे तर ढोंगच आहे. या ढोंगामुळे मनाची अस्वस्थता लपवू न शकलेल्या चंद्रकांतदादांनी लेखणी हाती घेतली आहे. त्यांनी या ढोंगावर, खोटेपणावर, गळक्या किटल्यांवर आसूड ओढणारे लिखाण केले पाहिजे. चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखे आहे. दादांनी पत्र लिहिणे म्हणजे सगळ्यांचीच दाणादाण उडणार. पुन्हा भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी सुरूच केली आहे. प. बंगालातील भाजप नेत्यांची अलीकडची भाषणे दादांच्या हवाली करूया. तेथे भाषाशुद्धीसंदर्भात मोठे काम चंद्रकांत पाटलांना करावे लागणार आहे. चीनने लडाखची जमीन गिळली तरी चालेल, पण मुंबईतल्या इंच इंच जमिनीसाठी किटल्यांनी उकळायलाच पाहिजे! दादा, उचला लेखणी, करा त्या ढोंगावर हल्ला! महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला आहे! अशी मल्लीनाथी या अग्रलेखात करण्यात आली आहे.