…हा तर मढ्यावरचे लोणी खाण्याचा प्रकार- शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । कश्मीरातील जवानांच्या हत्येचा बदला घ्यायचा असेल तर पुन्हा भाजपला मते द्या, कमळासमोरचे बटण दाबा, असा प्रचार सुरू करणे म्हणजे मृत जवानांच्या मढ्यावरचे लोणी खाण्यासारखा प्रकार असल्याचा हल्लाबोल आज शिवसेनेने भाजपवर केला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या सामनातील आजच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, अलीकडे आमचा तिरंगा अभिमानाने फडकवण्यात कमी व मृत जवानांच्या शवपेट्यांना गुंडाळण्यातच जादा खर्च होत आहे. कोणतेही युद्ध नाही, पण एकाच वेळी ४० जवान गतप्राण होतात. हे गेल्या साडेचार वर्षांत पहिल्यांदा झालेले नाही. उणीदुणी काढण्याची ही वेळ नाही. सरकार व जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची, त्यांचे आत्मबल वाढविण्याची ही वेळ आहे, पण सरकार विसरले असले तरी देशाची जनता काही गोष्टी विसरत नसते. काँग्रेस राजवटीत कश्मीरात अशा घटना घडल्या तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींची वीरश्रीयुक्त भाषणे लोकांनी सोशल मीडियावर टाकून त्यांना त्यांच्याच भूमिकेचे स्मरण करून दिले आहे. छप्पन्न इंचांची छाती हा शब्द कश्मीरसंदर्भातच आला. आमचे सैनिक कमजोर नसून दिल्लीत बसलेले सरकार लाचार आणि कमजोर असल्याचा घणाघात तेव्हा श्री. मोदी करीत होते. पाकिस्तानात घुसून मारले पाहिजे असा तेव्हा त्यांचा बाणा होता. या सगळ्याची लोक पंतप्रधान मोदी यांना आठवण करून देत आहेत. आता मोदी व त्यांचे सरकार नेमकी कोणती किंमत पाकड्यांना चुकवायला लावते याची वाट सगळेच पाहत आहेत.

या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, कश्मीरातील तरुणांना, मेहबुबा मुफ्तीच्या पक्षाला अफझल गुरू, बुरहाण वाणीसारखे लोक स्वातंत्र्यसैनिक व जवळचे वाटतात, तितके आमचे पंतप्रधान मोदी का वाटत नाहीत? पंतप्रधान मोदी जेव्हा कश्मीरवासीयांना आपले वाटतील तेव्हा शांततेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे गेलेले असेल. कश्मीर प्रश्‍नाचे राजकारण देशात करायचे, पण कश्मीरात उद्ध्वस्त झालेल्या गुलाबावर पाय ठेवून पुढे जायचे हे आता तरी थांबावे. कश्मीरातील जवानांच्या हत्येचा बदला घ्यायचा असेल तर पुन्हा भाजपला मते द्या, कमळासमोरचे बटण दाबाफफ असा प्रचार सुरू करणे म्हणजे ४० मृत जवानांच्या मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे असल्याची टीका यात करण्यात आली आहे. साडेचार वर्षांत कश्मीरातील गुलाबाचे ताटवे का कोमेजले, आशेच्या गुलाबपाकळ्या का झडून पडल्या याचे उत्तर देण्याची मागणीदेखील यात करण्यात आली आहे.

Add Comment

Protected Content