रावेर प्रतिनिधि । आगामी रावेर लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेतर्फे चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत दादा पाटील चोपडा येथील माजी आमदार कैलास पाटील शिवसेनेचे जिल्हा संघटक ज्ञानेश्वर महाराज-जळकेकर यांचे नाव आघाडीवर असूस याशिवाय, दोन नवे चेहरे इच्छुक असुन त्यांची मातोश्रीवर बैठक होणार आसल्याचे वृत्त आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सध्या भाजपच्या विद्यमान खासदार रक्षाताई खडसे या करत आहेत. परंतु राज्यस्तरावर भाजप-शिवसेना युती झाल्यास हा मतदार संघ भाजपकडून शिवसेना मागणार असल्याची शक्यता असुन याला सेनेच्या एका पदाधिकार्यांकडून दुजोरा सुध्दा मिळाला आहे. तर युती न झाल्यास आपसूकच शिवसेनेला ही जागा लढविणे भाग आहे. त्यामुळे शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांकडून रावेर लोकसभा मतदारसंघात संपर्क अभियानावर भर दिला जात आहे. रावेर मतदारसंघामध्ये भाजपाकडे रावेर,मुक्ताई नगर,जामनेर,मलकापुर, भुसावळ विधानसभेच्या जागा असुन शिवसेनेकडे चोपडा विधानसभेची जागा आहे. युती होवो अथवा नको…येथून सेनेचा उमेदवार निवडून आणू असा आत्मविश्वास शिवसैनिकांमध्ये आहे. दरम्यान, शिवसेनेमध्ये काही उमेदवारांच्या नावावर खलदेखील सुरू झाला आहे. यात प्रामुख्याने चोपडा येथील माजी आमदार कैलासबापू पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांतदादा पाटील व ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांची नावे आघाडीवर आहेत. तर यासाठी दोन नवीन उमेदवारांनीदेखील प्रयत्न सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या इच्छुकांची लवकरच मुंबईत मातोश्रीवर बैठक होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.