शिवसेना नेत्यांना भितीने ग्रासलेय : दरेकरांचा टोला

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याची धास्ती शिवसेना नेत्यांना वाटत असल्याने त्यांनाच या भितीने ग्रासले असल्याचा टोला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मारला आहे.

सध्या भाजप व शिवसेनेत जोरदार वाक्युध्द सुरू आहे. यात आता प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, शिवसेना नेते संजय राऊत यांना माध्यमांशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही, पोटशूळ बाहेर काढल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही. सरकारने एक वर्षे पूर्ण केल्याचे राऊत सांगत आहेत, पण सरकारचा कारभार कोणीही करीत असतो, गाडी पुढे जात असते, पण या एका वर्षात काय केले ? असा सवाल प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

दरेकर पुढे म्हणाले की, सरकारने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना दिलेला शब्द पाळला नाही, शेतकरी अतिवृष्टीने हैराण झाला आहे, कोकणात निर्सग वादळातील शेतकर्‍यांना मदत नाही, कामगार बेजार आहे, बेरोजगारीचे करार करतात पण प्रत्यक्षात काही होत नाही, आजही कोविड नियंत्रणात आणू शकत नाही, या परिस्थितीत आमच्या सरकारने एक वर्षे पूर्ण केले अशा गमजा ते मारत असल्याचे दरेकर म्हणाले.

दरम्यान, दरेकर पुढे म्हणाले की, राज्यातील सरकार पाडणार, असे कोणीही बोलले नसताना शिवसेना नेत्यांना केवळ भीतीने ग्रासले आहे, म्हणूनच शिवसेना नेत्यांनाच स्वत: सरकार पडणार असल्याची सारखी भीती वाटत असावी. ऑपरेशन लोटसबाबत आम्ही काहीच बोललो नाही. तेच म्हणतात की, यामुळे साधे खरचटले नाही, पण भाजपाने काही ठरविले तर खरचटायचे तर दूर राहिले, रक्तबंबाळ व्हाल असा इशारा देतानाच दरेकर म्हणाले की, थडगी उकरून काढण्यची भाषा राऊत करीत आहे, पण बोलायाला फक्त त्यांनाच येते असे त्यांनी समजू नये असेही दरेकर यांनी म्हटले.

Protected Content