नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ”आजवर शिवसेनेवर अनेक हल्ले झालेत आणि यातून आम्ही पुढे गेलोत, आजही विधीमंडळात कमकुवत असलो तरी प्रत्यक्षात शिवसेना मजबूत आहे, शिवसेना म्हणजे युक्रेन नव्हे !” अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी आज विरोधकांवर टिकास्त्र सोडले. राज्यात मध्यावधी निवडणुका अटळ असल्याचेही ते म्हणाले.
खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही. विधीमंडळातील लढाया सुरूच राहतील. पीठासीन अधिकारी म्हणून बसविला जाणारा हा सत्ताधारी पक्षाचा माणूस असल्याने तो त्या-त्या पक्षाची भूमिका घेत असतो. पक्षविरोधी बाहेर कारवाया केल्या म्हणून शरद यादव यांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मात्र महाराष्ट्राच्या विधीमंडळात तो न्याय लावण्यात आला नाही. कायदा समान असतांना असे का घडले नाही ? असा प्रश्न त्यांनी विचारला. ही संसदीय लोकशाही नसल्याची टीका देखील त्यांनी केली.
राऊत पुढे म्हणाले की, सध्या राजकीय चढाओढ सुरू असून यात जनतेला काहीही मिळणार नाही. आपण शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. यामुळे तुमचा प्रश्न ओरीजनल कसा असू शकतो ? हा प्रश्न आधी मनाला विचारा. आणि मग नंतर इतरांना विचारा असा सल्ला त्यांनी दिली. या संदर्भात आम्ही कायदेशीर लढा देणारच आहोत. ११ तारखेला सुप्रीम कोर्टात तारीख आहे. हा प्रश्न प्रलंबीत असतांना विधीमंडळात निवडणूक घेणे घटनाबाह्य आहे. शिवसेना म्हणजे युक्रेन नाही. आमच्यावर कुणी हल्ला करणार नाही, आणी आमच्यावर कुणी ताबाही घेऊ शकणार नाही. विधीमंडळात शिवसेना कमजोर झाली असली तरी राज्याच्या कान्याकोपर्यात अद्यापही आमचा पक्ष बळकट असल्याचे ते म्हणाले.
राऊत यांनी पुढे नमूद केले की, आजवर अनेक फुटी पडूनही आम्हाला नष्ट करता आले नाही. जोवर शिवसेना आहे तोवर महाराष्ट्राचे तुकडे करता येणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. भाजपने केलेले सत्तांतर हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. त्यांनी शिवसेना फोडून दाखविली. याच्या पलीकडे याला काहीही नसल्याचे त्यांनी सांगितले. उदयपूरसह अनेक घटनांमध्ये भाजपचे कार्यकर्ते असल्याचे समोर येत आहे. यामुळे दंगली घडवून निवडणुका जिंकायची योजना सुरू असल्याची टीका त्यांनी केली. यामुळे गुजरातसोबत महाराष्ट्रातही निवडणुका होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.