मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शहरातील काही भागातील वाहून जाणारे नैसर्गिक व गटारीचे पाणी शनिमंदिर वार्डाच्या मागच्या भागातील मोठ्या गटारीतून वाहून जाते. परंतु, येथे एका प्लॉटधारकाने हा नाला अडविल्याने यातील पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून यानुकसानीस प्लॉटधारकास जबाबदार ठरवून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेतर्फे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुक्ताईनगर येथील प्रभाग क्र . ६ च्या शनिमंदिर वार्डाच्या मागच्या बाजूला शहरातील काही भागातील वाहून जाणारे नौसर्गिक व गटारीचे पाणी वाहून नेणारा मोठाच नाला आहे. यातून शहरातील काही भागातील गटारीच्या पाण्याचा निचरा होत आहे. परंतु, या नाल्यावर शनिमंदिरच्या मागील भागातील एका प्लॉटधारकाने पाईप टाकून स्वतःच्या वापरासाठी पूल तयार केला आहे. याचा दुष्परिणाम म्हणजे बुधवार २६ जून रोजी रात्री आलेल्या पावसाने नाल्यात पुलाचा अडथळा असल्याने नाल्याच्या पाण्याच्या निचरा योग्य प्रकारे होऊ शकला नाही. नाल्यातील पाणी साचल्याने परिसरात नाल्यातील पाणी पसरले सुमारे १०० ते १५० घरांमध्ये शिरल्याने त्याला तलावाचे स्वरूप आले. मध्यरात्री घरांमध्ये अचानक पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होऊन त्यांची धावपळ उडाली. तर घरांमध्ये पाणी शिरल्याने काही नागरिकांनी मध्यरात्रीच स्थलांतर करावे लागले. पाणी घरात शिरल्याने घरांचे देखील नुकसान झाले आहे. या प्रकाराने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असून शिवसेना तसेच नागरिकांतर्फे त्या प्लॉटधारकाने बांधलेल्या रस्त्याला परवानगी घेतली आहे का ? त्या प्लॉटधारकावर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच झालेल्या नुकसानीस जबाबदार धरून ती वसूल करून तत्काळ हा रस्ता हटविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेना शहर प्रमुख प्रशांत टोंगे, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोईर, राजेंद्र हिवराळे वसंत भलेभले, प्रफुल पाटील, महेंद्र नयकर , निशिकांत एदलाबादकर, जगन्नाथ पाटील, आशिष तायडे, राजेंद्र वाघ, किशोर कोसोदे, प्रमोद पोहेकर, दशरथ पाटील, अरुण निंभोरे, डोंगरसिंग सावकारे आदींच्या स्वाक्षरी आहेत.