मुंबई प्रतिनिधी । राजस्थानातील फोन टॅपींग प्रकरण हे अतिशय गंभीर असल्याचे नमूद करत राहूल गांधी यांना काम करू न देण्याचा विडा काही जणांनी उचलला असल्याचा आरोप आज शिवसेनेने केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनामध्ये आज राजस्थानातील राजकीय पेच आणि फोन टॅपिंगच्या प्रकरणावर भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, राजस्थानमधील राजकीय युद्धाचे कवित्व अद्यापि संपलेले नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर सचिन पायलट यांची जी सौदेबाजी सुरू होती ती पैशांच्या देवाणघेवाणीच्या टोकापर्यंत होती. म्हणजे राजस्थानचे गेहलोत सरकार हे पैसे चारून पाडायचे, घोडेबाजार करून बहुमत विकत घ्यायचे हे ठरले होते. सचिन पायलटांचे अन्यायाविरुद्ध बंड वगैरे प्रकरण झूठ होते याचा पर्दाफाश मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला आणि त्यासाठी पायलट व भाजप नेत्यांमधील फोन संभाषण समोर आणले. ते धक्कादायक तितकेच खळबळजनक आहे. गेहलोत सरकार पाडण्यासाठी केंद्रीय सत्तेचा दबाव व पैशांचा वापर झाला. तो काँगेसने उधळून लावला.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, राजस्थानात बहुमताचे सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू होत्या व त्यासाठी आमदारांची खरेदी चढया भावाने सुरू होती. सचिन पायलट यांच्या बंडामागे नीतिमत्ता कमी व पैशांची फूस जास्त होती. हा जनता व लोकशाहीशी द्रोह आहे. हा भ्रष्टाचारच आहे व गेहलोत सरकारने पुराव्याच्या आधारे भाजपचे एक नेते व केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. शेखावत यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे व आरोप आहेत आणि त्याबाबत भाजप बोलायला तयार नाही. फोनवरील संभाषण ऐकणे, पाळत ठेवणे हे जितके बेकायदेशीर आहे, तितकेच सरकार पाडण्यासाठी आमदारांना विकत घेणेही गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे. राजस्थानमधील गेहलोत सरकार तर लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे. तरीही ते पाडण्याचा उद्योग झाला. मध्य प्रदेशात लोकांनी निवडून दिलेले सरकार होते. तेही पाडले. राजस्थानात पायलट विरुद्ध गेहलोत हा वाद होताच, पण तरीही हे सरकार अंतर्विरोधाने पडले नाही. उलट गेहलोत यांनी डाव भाजपवरच उलटवला. राजस्थानमधील पैशांच्या व्यवहाराबाबत ज्या ऑडिओ टेप्स समोर आल्या आहेत, त्यावर भाजपवाले म्हणतात, हे सर्व प्रकरण बनावट आहे. असेलही, पण चौकशी व्हायलाच हवी. फोन टॅपिंग प्रकरण साधे नाही व ते फक्त राजस्थानातच होत आहे अशातला प्रकार नाही. आपल्या देशावर आज अदृश्य आणीबाणीच्या सावल्या फिरत आहेत असा आरोप सुरू आहे.
फोन टॅपिंग तसंच पैशांच्या बळावर सरकार पाडणं घटनाद्रोह आहे. राजस्थानातील फोन टॅपिंगने अनेकांचे पितळ उघडे झाले, पण काँगेस पुढार्यांचे आपापसातील संभाषण कोणी चोरून ऐकले व ते राहुल गांधींपर्यंत पोहोचवले तरी बरेच गौप्यस्फोट होतील. राहुल गांधी यांना धड कामच करू द्यायचे नाही, असा विडाच काही लोकांनी उचलला आहे. याचा फटका समस्त विरोधी पक्षाला बसतो. फोन टॅपिंग हा गुन्हा व व्यक्तिगत स्वातंत्र्यावर आघात आहेच. लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले सरकार पैशांच्या बळावर पाडणे हा घटनाद्रोह आहे. त्यामुळे कोणता गुन्हा मोठा हे ठरवायला हवे, असं या अग्रलेखामध्ये म्हटलं आहे. राजस्थान प्रकरणात भाजपची अवस्था केले तुका आणि झाले माका अशीच झाली आहे. काँगेस पक्षावर, त्यांच्या कार्यपद्धतीवर फुले उधळण्याची आवश्यकता नाही. त्यांच्यात अंतर्गत कलह किंवा जुने-नवे वाद आहेत व ते संपणारे नाहीत. राहुल गांधी यांना यश मिळवू द्यायचे नाही यासाठीच जणू हे वाद काही ठरावीक मंडळींकडून ठरवून काढले जातात. मध्य प्रदेश त्यातूनच गेले. राजस्थान तूर्त बचावले, असे यात नमूद करण्यात आले आहे.