शिवसेना-भाजपचे ‘वाघ’ अमळनेरात एकाच व्यासपीठावर (व्हीडीओ)

अमळनेर (प्रतिनिधी)  जंगलात जसे वाघ दिसणे मुश्कील असते तसे राजकारणातही दोन वाघ एका व्यासपीठावर येणे हा मोठा दुर्मिळ योग होता. हा योग गुरुवारी येथे जुळून आला. निमित्त होते शहरातील मा. बाळासाहेब ठाकरे चौक अनावरण सोहळ्याचे. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ एकाच व्यासपीठावर आले होते. या दोघांची एका व्यासपीठावर उपस्थिती अनेकांना उत्साह देणारी तर अनेकांना धडकी भरवणारी होती.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र योग्यवेळी समझोता होऊन युती कायम राहिल्याने तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याप्रसंगी उदय वाघ म्हणाले की, शहरातील प्रभाग 15 मध्ये आतापर्यंत प्रताप शिंपी यांनी विकासाच्या माध्यमातून राजकारण करीत अनेक विधायक कामे केलेली आहेत याचा अभिमान आहे. त्यांनी आज बाळासाहेब ठाकरे चौक अनावरण सोहळाप्रसंगी भाजप आणि शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एका व्यासपीठावर आणले महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर पहिलाच कार्यकर्त्यांचा मनोमिलन मेळावा अमळनेर येथे पार पडत आहे. याचा मोठा आनंद आहे, असेही ते म्हणाले.

गुलाबराव वाघ म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अमळनेर शहरात चौक अनावरण सोहळा नगरसेवक प्रताप शिंपी यांच्या माध्यमातून होतोय, याचा शिवसेनेला अभिमान आहे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शहराच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहावे. आजचा हा कार्यक्रम युतीच्या शुभ मुहूर्तावर नगरसेवक प्रताप शिंपी यांनी घडवून आणला आहे. पदाधिकार्‍यांच्या मनातील व कार्यकर्त्यांच्या मनातील किंतु परंतु दूर झाल्याचे दिसत आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार साहेबराव पाटील म्हणाले की, व्यासपीठावर दोन्ही वाघ एकत्र आलेले आहेत आता कोणाची गरज नाही. शहराच्या विकासासाठी जनतेने व सर्व नगरसेवकांनी चांगल्याप्रकारे सहकार्य केल्याने विकासाची कामे करता आली. प्रभाग 15 मध्ये नगरसेवक प्रताप शिंपी नावाचा साधा माणुस दोन ते अडीच कोटीची कामे करतो संपूर्ण प्रभागात रस्ते वीज पाणी याबाबत जनता आनंदी आहे, याचे समाधान आहे. अमळनेर तालुक्याचा विकास करीत असताना भाजप शिवसेना एकत्र आल्याने त्याचा चांगला फायदा होईल असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर राजेंद्र पिंगळे यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, उपजिल्हाप्रमुख डॉक्टर राजेंद्र पिंगळे, माजी नगरसेवक संजय पाटील , माजी शहर प्रमुख नितीन निळे, शिवसेनेच्या महिला शहरप्रमुख मनीषा परब, उपनगराध्यक्ष विजय लांबोळे, नगरसेवक विवेक पाटील, रामकृष्ण पाटील, राजू महाजन, मनिषा शिंपी हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक प्रताप शिंपी, नगरसेवक जीवन पवार, उपशहर प्रमुख शिवसेना व शिवसैनिक यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहिदांना श्रद्धांजली देण्यात आली. आभार नगरसेवक प्रताप शिंपी यांनी मानले.

पहा– उदय वाघ आणि गुलाबराव वाघ यांच्या सभेबाबतचा हा वृत्तांत.

Add Comment

Protected Content